बुलढाणा : बुलढाण्यातील मलकापूरमधल्या सर्वधर्मीय स्मशानभूमीतला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीतील मानवी अवयव रस्त्यावर येत आहे. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्याने दफन केलेले पार्थिव भटके कुत्रे उकरुन काढून रस्त्यावर आणत आहेत. कोरोना काळात मृतांचा आकडा वाढल्याने कमी जागेत होतो दफनविधी केला जात आहे. दरम्यान मृतदेहांची अवहेलना होत असल्याने नागरिकांसह नगसेवकही संतप्त झाले असून सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी करत आहेत.


मलकापूर शहरात नदी काठावर माता महाकाली वॉर्ड परिसरात असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीतील हा प्रकार आहे. या स्मशानभूमीची नदी पात्राकडील संरक्षण भिंत ही गेल्या काही वर्षांपासून क्षतिग्रस्त होऊन पडलेली आहे. त्यामुळे नदी पात्राकडून ही स्मशानभूमी उघडीच आहे. या स्मशानभूमिमध्ये सर्वधर्मिय मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात तर काही दफनही केले जातात. मात्र याठिकाणी आता जागा अपुरी पडू लागल्याने दफन करण्यात येणाऱ्या मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 


कोरोना काळात मृतांचा आकडा वाढल्याने सध्या स्मशानभूमीत जागा कमी पडू लागली आहे. कमी जागेत दफनविधी करण्यात येत आहे. अशातच शहरातील आणि परिसरातील मोकाट कुत्रे हे स्मशानभूमीत जाऊन त्याठिकाणी पुरण्यात आलेले मृतदेह उकरुन काढत आहेत. तसंच हे मृतदेह फरफटत नेण्याचाही प्रकार घडत आहे. याशिवाय काही प्रेतांचे लचके तोडण्याचीही बाब समोर आल्याने जनभावना दुखावल्या जात आहेत. काही मृतदेहांचे सांगाडे या परिसरात पडलेले आढळून आल्यानंतर अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. नागरिकांनी स्मशानभूमीत सुरक्षारक्षक ठेवण्याची मागणी केली आहे.