मुंबई :  एसटी महामंडाळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं या मागणीसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी धडक दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून चप्पलफेल करण्यात आली, तसेच संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. या आंदोलनमागे कोण आहे?  याचा शोध घेणार असल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे कोण आहे? याचा शोध मुंबई पोलिस घेणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारा कोणीही मोठा नेता नव्हता. त्यामुळे या आंदोलकांना कोणी भडकवले का? कोणाच्या सांगण्यवरून आंदोलक येथे आले याची चौकशी केली जाणार आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे. 


गृहमंत्री वळसे पाटील यांनी ट्वीट करत प्रतिक्रिय दिली आहे. वळसे पाटील म्हणाले,  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत. 


आक्रमक झालेले कर्मचारी जेव्हा निवास्थानाबाहेर आले. यावेळी निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही. यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र कर्मचाऱ्यांनी थेट 'सिल्व्हर ओक'समोर ठिय्या मांडण्याची भूमिका घेतली. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि पोलीस प्रशासनामध्ये संघर्षही झाला.


संबंधित बातम्या :


ST Strike : शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन; राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश आहे का?


ST Workers Protest: सुप्रिया सुळे चर्चेसाठी आल्या पण कर्मचारी आक्रमक


ST Workers Protest : शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक; एसटी कर्मचारी आक्रमक