Abu Azmi : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित मनसे मेळाव्यामध्ये आजानसाठी मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. यावरुन राजकीय वातावरण तापले होते. यावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अबू आझमी यांनी राज ठाकरे यांना अटक करा, बेड्या ठोका, अशी मागणी केली आहे. दरम्यान,  मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिद, मदरशावर धाडी टाका आणि मशिदीवरील भोंगे काढा, असे वक्तव्य केले होते .


मशिदींवर लाऊडस्पीकर किती वाजतो? आणि इतर ठिकाणी किती वाजतो? हे पाहा. राज ठाकरे यांची सभा सायलन्स झोन येथे झाली, राज ठाकरे यावर कारवाई करा, अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे. राज ठाकरेंसारख्या नेत्याची काही औकात ना,ही ज्यांचे आमदार नाही ते मनाला वाटेल ते बोलतात. राज ठाकरे यांना अटक करून तुरुंगात टाकावे अशी मी शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. लाऊडस्पीकरला परवानगी आहे. मशिदींमध्ये फक्त 2 मिनिटं अजान होते. राज ठाकरेंनी जी सभा घेतली त्यावर कारवाई व्हावी, असेही अबू आझमी म्हणाले.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सरकार चालवण्याची महत्वाची भूमिका बजावत आहेत. काही असे लोक आहेत, ज्यांची औकात नाही ते मुस्लिम धर्माला त्रास देत आहेत. सानपाडा येथे शिवसेनेचे लोक मशीद बांधण्यात आक्षेप घेत आहेत. या मुस्लिम बांधवाना सुरक्षा दिली पाहिजे. या राज्यात सेक्युलर सरकार आहे तिथे शिवसेनेचे नेते आक्षेप घेत आहेत, असे अबू आझमी म्हणाले. 



धर्म बनला तेव्हा लाऊडस्पिकर होता का? 
राज ठाकरे म्हणाले आहेत की, मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे. माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. मात्र तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. सकाळी पाच वाजल्यापासून त्रास होतो. कोणत्या धर्मात लाऊडस्पीकर लिहिलं आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांमध्ये बघा. कुठेही तुम्हाला लाऊडस्पीकर दिसणार नाही. तुमच्या परमेश्वरांशी प्रार्थना करायची असल्यास करा, मात्र घरात असं ते म्हणाले आहेत.