Yashwant Jadhav : सध्या आयकर विभागाच्या कारवाईमुळे चर्चेत आलेल्या यशवंत जाधव यांच्या संपत्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. यशवंत जाधव यांनी शेल कंपनीच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा केला असल्याची चर्चा रंगली आहे. आयकर विभागाने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी ते होते. कधीकाळी हलाखीच्या परिस्थिती असणारे यशवंत जाधव यांनी राजकारणात मोठी मजल मारली.
शिवसैनिक म्हणून त्यांनी शिवसेनेत कामास सुरुवात केली. पुढे शाखाप्रमुख, नगरसेवक, शिवसेना उपनेता ते स्थायी समिती अध्यक्षपदापर्यंत अशी त्यांनी मजल मारली. पत्नी यामिनी जाधव यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणूनही निवडून आणण्यास यशस्वी ठरले.
सन 1997 मध्ये यशवंत जाधव पहिल्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. एखाद-दुसरा अपवाद वगळता जाधव सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. जाधव यांची पत्नी यामिनी जाधवही नगरसेविका होत्या. सध्या त्या शिवसेनेच्या आमदार आहेत.
शिवसेनेत उत्कर्ष
यशवंत जाधव हे सन 1997 साली पहिल्यांदा माझगावमधून मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. नगरसेवक पदाच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना स्थायी समितीवर काम करण्याची संधी मिळाली. यशवंत जाधव हे सन 1997 ते 2002 पर्यंत मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य राहिले. सन 2001 ते 2002 ते प्रभाग समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 2002 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांची नगरसेवकपदाची त्यांची संधी हुकली. त्या दरम्यान संघटनेसाठी शिवसेना पक्षाने उपविभाग प्रमुखाची जबाबदारी त्यांना दिली. त्यानंतर 2007 साली ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले.
सन 2008 ते 2009 ते बाजार आणि उद्यान समितीचे अध्यक्ष होते. तर, 2011 मध्ये जाधव यांना शिवसेनेचं उपनेते पद देण्यात आले. सन 2012 ला झालेल्या निवडणुकीत यशवंत जाधव यांचा पराभव झाला. पण त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या निवडून आल्या.
2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ते तिसर्यांदा नगरसेवक झाले. 2017-2018 या कालावधीत त्यांनी सभागृह नेत्याची जबाबदारी पार पाडली. सन 2018 ला त्यांना मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष करण्यात आले. यशवंत जाधव हे 2018 ते मार्च 2022 पर्यंत स्थायी समिती अध्यक्ष राहिले. जाधव यांनी भायखळ्यामधून विधानसभेची निवडणूकही लढवली पण त्यांचा पराभव झाला.
जॉनी लिव्हरसोबत काम
यशवंत जाधव यांची लहानपणी कौटुंबिक आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. आर्थिक तंगीवर मात करण्यासाठी त्यांनी ऑर्केस्ट्रातही काम केले. बॉलिवूडमधील कॉमेडियन अभिनेते जॉनी लिव्हर यांच्यासोबतही जाधव यांनी काम केले आहे. यशवंत जाधव हे चांगले गायक आणि डान्सर आहेत. त्यांचा गायनाचा छंद अनेक कार्यक्रमांमध्ये दिसला आहे.
आई पालिकेत सफाई कामगार
यशवंत जाधव हे कोकणातील आहेत. यशवंत जाधवांना २ मुलं आणि १ मुलगी आहे. यशवंत जाधव यांच्या आई महापालिकेतच सफाई कामगार होत्या. आई सफाई कामगार म्हणून काम करताना लहानपणी यशवंत जाधव मदतही करत असे. यशवंत जाधव हे नगरसेवक होईपर्यंत त्यांच्या आई सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या.