Maharashtra News: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण (Sushant Singh Rajput Death Case) पुन्हा एकदा चर्चेत आलंय. काल संसदेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तेव्हापासून दिशा सालियान (Disha Salian Case) आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणासंदर्भाशी निगडीत अनेक गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. 


सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरुन शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) फोनवर 44 कॉल 'AU' नावानं आले असल्याची माहिती शेवाळेंनी संसदेत बोलताना दिली. 'एयू' (AU) म्हणजे, आदित्य उद्धव असं बिहार पोलिसांनी सांगितल्याची माहिती खासदार राहुल शेवाळेंनी दिली. तर यावर बोलताना लव्ह यू मोअर म्हणत आदित्य ठाकरेंनी राहुल शेवाळेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, राहुल शेवाळेंचं लग्न ठाकरेंनी कसं वाचवलं? ते आम्हाला माहिती आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राहुल शेवाळेंना टोलाही लगावला आहे. पण यासंपूर्ण आरोप-प्रत्यारोपांमध्ये AU हे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पण AU म्हणजे नेमकं कोण? राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपामध्ये किती तथ्य? तसेच, रियाच्या फोनवर आलेले AU नावाचे फोन आदित्य ठाकरेंचेच होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 


AU म्हणजे नेमकं कोण? 


सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी करताना मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चर्कवर्तीच्या फोन रेकॉर्ड्सही तपासले होते. त्यावेळी रियाचं AU नावाच्या व्यक्तीसोबत एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 44 वेळा संभाषण झाल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी ही व्यक्ती म्हणजे, आदित्य ठाकरे असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तसेच, यासोबतच सुशांतची मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणही पुन्हा चर्चेत आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्सची चौकशी केली. त्यातून AU ही व्यक्ती आदित्य उद्धव ठाकरे नसल्याचं समोर आलं होतं. तर रियाच्या फोनवर फोन करणारी व्यक्ती रियाची मैत्रीण अनन्या उधास असल्याचं निष्पन्न झालं होतं. 


संसदेनंतर महाराष्ट्राच्या विधीमंडळातही दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चर्चा 


काल (बुधवारी) शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत बोलताना आदित्य ठाकरेंवर आरोप केल्यानंतर आज (गुरुवारी) शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनीही दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी लावून धरली. तसेच, यावरुन सभागृहात गदारोळ झाला आणि सत्ताधारी आमदारांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी सुरू केली. 


विधीमंडळाच्या बाहेर बोलताना नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, "आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येऊ द्या. आजही दिशा सालियानची केस मुंबई पोलिसांकडे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना  विनंती आहे की सुशांत सिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करा. 8 जूनला काय झाले? दोनवेळा तपास अधिकारी का बदलला? Cctv का गायब झाले?  visitor book चे त्या 2 दिवसांचे पान का फाडले गेले? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत."


सुशांत सिंह मृत्यू प्रकरण काय? 


सुशांत सिंह मृत्यू प्रकरण फक्त राज्यातच नाहीतर संपूर्ण देशभरात गाजलं होतं. सिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं मुंबईतील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. अगदी सुशांतनं खरंच आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली इथपासून ते सुशांतच्या हत्येमागे काही बॉलिवूडकर किंवा राजकीय नेत्यांचा हात तर नाही? इथपर्यंत. अनेक चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, अशा मागणीनं जोर धरला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरु केली. चौकशीनंतर मुंबई पोलिसांनी सुशांतनं आत्महत्या केल्याचं स्पष्ट केलं होतं. पण सुशांतच्या कुटुंबियांनी बिहार पोलिसांत तक्रार दाखल करत सुशांतच्या मृत्यूसंदर्भात संशय व्यक्त केला. तेव्हापासून या प्रकरणात बिहार पोलिसांची एन्ट्री झाली. बिहार पोलिसांनी तपासाची सूत्र हाती घेत तपासाला सुरुवात केली. त्यानंतर मुंबई पोलीस आणि तत्कालीन महाराष्ट्र सरकारवरही अनेक आरोप झाले. त्यानंतर यामध्ये दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचाही संबंध असल्याचं बोललं जाऊ लागलं. 


दिशा सालियान मृत्यू प्रकरण नेमकं काय? 


सुशांतची मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणालाही सुशांत मृत्यू प्रकरणाची जोड देण्यात आली. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्या रात्री पार्टीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. ज्या पार्टी दिशाचा मृत्यू झाला, त्या रात्री एका पक्षाचे एक मोठे मंत्री आणि नेते उपस्थित होते. त्यांचा बचाव करण्यासाठी दिशाच्या हत्येला आत्महत्या असं संबोधलं जात असल्याचा आरोप सातत्यानं केला जात होता. पण तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्ट होत होतं की, त्या रात्री दिशा आणि तिच्या मित्रांशिवाय दुसरं कुणीही नव्हतं. दिशाच्या पोस्टमॉर्टम अहवालातही दिशाचा अपघाती मृत्यू झाला नसून तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचंही समोर आलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sushant Singh Rajput: सुशांतसिंह प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, फाईल पुन्हा ओपन करण्याची मागणी