Sanjay Raut : हे सरकार औटघटकेच असून, सरकार भ्रष्टाचाराच्या ओझ्यानंच पडणार असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. ज्यांच्यावर बलात्कारापासून विनयभंगापर्यंतचे आरोप आहेत, अशा व्यक्तीने आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) आरोप करणं म्हणजे फुटीर लोक किती खालच्या स्तरावर गेलेत हे दिसून येत आहे. खासदार राहुल शेवाळेंनी (Rahul Shewale) केलेले आरोप पोरकटपणाचे आणि बिनबुडाचे असल्याचे संजय राऊत म्हणाले. नागपूरच्या अधिवेशनात सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर ज्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप सुरु आहेत, त्याला तोंड देताना सरकारची धावपळ सुरु आहे. त्यातून लक्ष विचलीत करण्यासाठी आरोप सुरु आहेत. हे सरकार भ्रष्ट मार्गानं सत्तेत आलं असून,  भ्रष्टाचाराच्या ओझ्यानंच पडेल असं म्हणत राऊतांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.


संजय राऊतांनी आज सकाळी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर जोरदार टीका केली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपाला राऊतांनी आज प्रत्युत्तर दिलं. आमच्यावर कितीही आरोप करा, माणसं फोडो, माणसं फोडा शिवसेना आणि शिवसैनिक खचणार नाही. मागे हटणार नाही. जे हा खेळ करतायेत त्यांचं राज्य औटघटकेच असल्याचे राऊत म्हणाले. 


महाराष्ट्र पोलिसांवर तुमचा विश्वास नाही का?


मुख्य प्रकरणापासून लक्ष विचलीत करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले. सुशांत सिंह राजपूत आत्महत्याच होती हे सीबीआयने सांगितले आहे. तरीही आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहेत. बिहार पोलिस त्यांच्या राज्यात. सुशांतसिंग प्रकरणी आदित्य ठाकरेंना सीबीआयने क्लिनचीट दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांवर तुमचा विश्वास नाही का? असा सवालही यावेळी राऊतांनी उपस्थित केला.  
हे प्रकरण ज्यांनी काढलं आहे, त्यांनी स्वत:चा अंतरआत्मा पाहावा. जी व्यक्ती त्या सभागृहाचा सदस्य नसते, त्याच्यावर बोलता येत नाही. विषय काय होता आणि आपण बोलला काय? हे सगळं ठरवून चाललं असल्याचे राऊत म्हणाले. 


राहुल शेवाळेंचा आरोप काय?


अभिनेता सुशांत सिंह राजपूत  प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे  यांनी  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू (AU)नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केलाय. लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी हा गंभीर आरोप केलाय. परंतु, शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. राहुल शेवाळे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, असे आव्हान कायंदे यांनी दिलं आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


आदित्य ठाकरेंच्या नावाने रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप