MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी (ST Employees Salary) राज्य सरकारवर अवलंबून राहू नका, अशा आशयाचे पत्र प्रधान सचिवांनी एसटी महामंडळाला लिहिले आहे. सध्याच्या उत्पन्नात वाढ करत महामंडळ स्वयंपूर्ण करण्याचा सरकारचा सल्ला या पत्रातून एसटी महामंडळाला देण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. या पत्रानंतर आर्थिक विवंचनेतून चाललेल्या एसटी महामंडळाला पैसे देण्यासाठी राज्य सरकार हात झटकत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

  


एसटी महामंडळाकडून पगारासाठी अर्थ विभागाकडे थकित असलेल्या एक हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्यांना पगारासाठी 360 कोटी रुपये मिळायले हवेत. मात्र प्रत्यक्षात तेवढी रक्कम दरमहा मिळत नसल्याने महामंडळाकडून अर्थ विभागाला एक पत्र लिहित थकित रक्कम मागितली होती. त्यानंतर सरकारने पत्र लिहित आमच्यावर अवलंबून राहू नका, अशा आशयाचे पत्र लिहिले आहे.  


एसटी महामंडळाला एप्रिल ते डिसेंबर 2022 दरम्यान सवलींसह 5 हजार 142 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र एसटी महामंडळाचा एकूण खर्च 7 हजार 252 कोटी रुपये आहे. एसटी महामंडळाला या दरम्यान दोन हजार कोटी रुपयांच्या आसपास उत्पन्न कमी मिळाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला दरमहा 360 कोटी रुपये पगारासाठी देण्याचे सरकारने कोर्टात मान्य केले होते. मात्र मागील काही दिवसात सरकारकडून पगारासाठी येणारा निधी देखील अपुरा पडत आहे. वेळेवर पगार होत नसल्याने एसटी महामंडळातील कर्मचारी संघटना आक्रमक होत आहे.


अर्थ खात्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी


वेळेवर पगार न झाल्याने एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. सांगली विभाग, कवठेमहांकाळ आगारातील चालक भीमराव सूर्यवंशी यांनी वेळेवर पगार झाला नाही म्हणून आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी गळफास घेऊन काल आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पगाराविना आत्महत्या होत असल्याने अर्थ खात्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. महामंडळातील कर्मचाऱ्यांना छळण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अर्थ विभागातले अधिकारी जुमानत नाही असंच दिसतंय, अधिकारी परस्पर निधी अडवतात, बैठका घेतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा. कर्मचारी टोकाचं पाऊस उचलत असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तोडगा काढावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :