Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पात (Budget) तरतूद केलेल्या एकूण निधीपैकी आत्तापर्यंत केवळ 47 टक्केच निधी खर्च झाल्याचे समोर आले आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी आणि विकासकामांसाठी 6 लाख 46 हजार 536 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 14 फेब्रुवारीपर्यंत केवळ 3 लाख 4 हजार 430 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


अद्याप 53 टक्के निधी खर्च करणे बाकी


अर्थसंकल्पातील 47 टक्केच निधी खर्च झाला आहे. अद्याप 53 टक्के निधी खर्च करणे बाकी आहे. फेब्रुवारी महिन्याचे राहिलेले दिवस आणि मार्च महिना हा निधी खर्च करण्यासाठी आहे. मात्र, एवढ्या कमी दिवसात हा राहिलेला 53 टक्के निधी खर्च होणार का? हे देखील पाहावं लागेल. मात्र, केवळ 47 टक्केच निधी खर्च झाल्यानं सरकारवर टीका देखील होत आहे.  


 कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचा 59 टक्केच निधी खर्च 


दरम्यान, यातील महत्वाची बाब म्हणजे कृषी आणि पशुसंवर्धन हे दोन्ही महत्त्वाचे विभाग आहेत. या दोन्ही क्षेत्राससमोर संकटे असताना या विभागांचा केवळ 59 टक्केच निधी खर्च झाला आहे. मागील अर्थसंकल्पात कृषी आणि पशुसंवर्धन विभागासाठी 15 हजार 283 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. यापैकी 9 हजार 33 कोटी म्हणजेच 59 टक्केच रक्कम खर्च करण्यात आल्याचेही समोर आले आहे. पर्यावरण विभागाच्या बाबतीत देखील हीच गत आहे. पर्यावरण विभागासाठी 489 कोटी 93 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातील 80 कोटी 63 लाख रुपयांचाच निधी खर्च करण्यात आला आहे. म्हणजे केवळ 16 टक्केच निधी खर्च केला आहे. त्याचबरोबर सहकार विभागासाठी 7 हजार 426 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यापैकी 5 हजार 500 कोटी रुपये म्हणजेच 74 टक्के रक्कम खर्च झाली आहे. जलसंपदा विभागासाठी 21 हजार 364 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती. यापैकी केवळ 9 हजार 705 कोटी रुपये म्हणजेच 45 टक्के रक्कम खर्च झाली आहे. ग्रामविकास विभागासाठी 33 हजार 474 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यापैकी 17  हजार 75 कोटी रुपये म्हणजेच 51 टक्के रक्कम खर्च झाली आहे.


अर्थसंकल्पानंतर अडीच महिन्यातच कोसळलं महाविकास आघाडीचं सरकार


एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अडीच महिन्यांमध्येच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर भाजपच्या मदतीनं शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. या सरकारनं महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळं निधी खर्च करण्यावर मर्यादा आली होती.  दरम्यान, येत्या 9 मार्चला राज्याचा 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. सध्या वित्त व नियोजन विभाग तयारी करत आहे. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे त्यांचा पहिलाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Budget session : 27 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन, 9 मार्चला अर्थसंकल्प मांडणार