नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात (Nagpur News) सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवून फोन करणाऱ्याचा तपास सुरु केला आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचे  फोन आल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी दोनदा गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल आले. धक्कादायक म्हणजे पुन्हा एकदा  जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे कॉल आले आहेत.  त्यानंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागपूर पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचे कॉल आल्याची माहिती दिली आहे. 


 नागपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क  कार्यालयात आज सकाळी धमकीचे दोन कॉल आल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. जरी कॉल करणाऱ्या व्यक्तीने तो जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी बोलत असल्याचा दावा केला असला तरी धमकी देणारी व्यक्ती कोण आणि त्याने कुठून कॉल केले हे अजून स्पष्ट झालेले नाही. 


गडकरी यांच्या कार्यालयात आज लागोपाठ तीन कॉल


पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गडकरी यांच्या कार्यालयात आज लागोपाठ तीन कॉल आले. 10:55 वाजता आलेल्या पहिल्या कॉलमध्ये बोलणे झाले नाही. मात्र 11 आणि 11:55 वाजता आलेल्या पुढील दोन कॉलमध्ये धमकी देणाऱ्याने  जयेश पुजारी बोलत असल्याचे म्हटले आणि दहा कोटी रुपयांची मागणी केली. तसेच याची वाच्यता पोलिसांकडे करू नये असा इशाराही दिला. सोबतच त्याने संपर्कासाठी एक मोबाईल क्रमांकही दिला. तो मोबाईल क्रमांक मंगळूरमधील एका  मुलीचा आहे. ती तिथे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते. 


जयेश पुजारी सध्या बेळगाव जेलमध्येच आहे. मात्र, आज धमकी देणारा तो जयेश पुजारी आहे की कोणी खोडसाळपणा करत आहे हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.  ज्या मुलीचा नंबर संपर्कासाठी धमकी देणाऱ्या जयेश पुजारीने दिला. त्या मुलीचा एक मित्र बेळगाव तुरुंगामध्ये आरोपी म्हणून कैदेत आहे.


बेळगावातील तुरुंगातून गडकरींना आला होता धमकीचा फोन


दरम्यान  यापूर्वी 14 जानेवारीला  तीनदा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या नावाने धमकीचे कॉल आले होते. नंतर ते कॉल कर्नाटकातील बेळगाव तुरुंगातून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. आज पुन्हा त्याच गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे दोन कॉल आल्याने खळबळ माजली आहे.