Maharashtra Jalna Crime News: अल्पवयीन मुलांमध्ये मोबाईल (Mobile) पाहण्याचे प्रमाण अधिक वाढले आहेत. त्यातच मोबाईल गेम खेळणाऱ्या मुलांची संख्या देखील अधिक आहे. अशाच एका 'फ्री फायर' गेममध्ये जिंकलेल्या 100 रुपयांवरून अल्पवयीन मुले समोरासमोर भिडल्याची घटना जालना शहरातील (Jalna City) मोतीबाग परिसरात रविवारी रात्री उघडकीस आली आहे. दरम्यान, यावेळी झालेल्या चाकू हल्ल्यात सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आठ अल्पवयीन मुलांविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीबाग परिसरात असलेल्या दुखीनगर येथील अल्पवयीन फिर्यादी ऑनलाइन फ्री फायर गेम खेळतो. गेम खेळताना त्याची ओळख संशयितासोबत झाली. 18 मार्च रोजी फ्री फायर गेमचे 100 रुपये अल्पवयीन संशयिताला देण्याचे ठरले होते. रविवारी रात्री सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अल्पवयीन संशयिताने फोन करून फिर्यादीला शिवीगाळ केली. मोतीबागजवळ लवकर पैसे आणून दे, असे तो म्हणाला. फिर्यादी हा त्याच्या मित्रासोबत दुचाकी घेऊन मोतीबाग परिसरात गेला.
चाकू हल्ल्यात सहाजण गंभीर जखमी
फ्री फायर गेमचे 100 रुपये देण्यावरून फिर्यादीला संशयित अल्पवयीन आरोपीने फोनवरून शिवीगाळ करत, मोतीबागजवळ लवकर पैसे आणून दे असे म्हणाला. त्यामुळे फिर्यादी हा त्याच्या मित्रासोबत दुचाकी घेऊन मोतीबाग परिसरात गेला. दरम्यान यावेळी त्याला संशयितांनी शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी फिर्यादीने देखील मित्रांना बोलावून घेतले. दरम्यान यावेळी झालेल्या वादात सहाजणांवर आठ संशयित आरोपींनी चाकूने वार करून जखमी केले आहे. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कदीम पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा
या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळाला अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरु यांच्यासह पोलिस निरीक्षक सय्यद मजहर यांनी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सोनवळे यांनी माध्यमांना दिली आहे.
आई-वडिलांनी काळजी घेण्याची गरज...
अल्पवयीन मुलांच्या हातात देखील मोबाईल पोहचला असल्याने अनेकदा यामुळे होणाचे दुष्परिणाम समोर येत आहे. अशात अनेक अल्पवयीन मुलं मोबाईल गेमच्या जाळ्यात अडकले आहेत. मोबाईलमध्ये असलेले अनेक गेमवर मुलं पैसे देखील गुंतवत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे याच पैश्यांच्या देवाणघेवाणवरून त्यांच्यात वाद होत आहे. त्यातच हा वाद आता एकमेकांचा जीवघेण्यापर्यंत पोहचला असल्याचे जालन्यातील घटनेनंतर समोर येत आहे. त्यामुळे अशावेळी मुलांना मोबाईल वापरण्यासाठी देणाऱ्या आई-वडिलांनी काळजी घेण्याची गरज आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
धक्कादायक! दहा हजार रुपयांच्या खंडणीसाठी तृतीयपंथीयाचे लिंग परिवर्तन; जालन्यातील घटना