अमरावती : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकारनं वाय प्लस दर्जाची सुरक्षा जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा आणि स्थानिक पोलिस यांच्यात वादाचे पडसाद उमटत असतानाच केंद्रानं ही सुरक्षा व्यवस्था जाहीर केली आहे. त्यामुळे या पाठीमागे नेमका काय राजकीय संदेश आहे याची चर्चा रंगली आहे.
कंगना रनौत, किरीट सोमय्या आणि आता खासदार नवनीत राणा या तीन लोकांमध्ये काय साम्य आहे असं विचारलं तर तुम्ही गोंधळात पडाल. पण हे ते तीन लोक आहेत ज्यांना महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर केंद्राकडून खास सुरक्षाकवच पुरवण्यात आलं आहे. आज खासदार नवनीत राणा यांच्यासाठी वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय गृहमंत्रालयानं जाहीर केली आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या खरंतर अपक्ष निवडून आल्या आहेत. त्यांना त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला होता. पण निवडून आल्यानंतर त्या भाजपच्या अधिक जवळ गेल्या. महाविकास आघाडी सरकारवर त्यातही शिवसेनेवर त्यांच्या टीकेचा रोख सतत असतो. नुकतंच अमरावतीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रकरण गाजलं होतं. त्यातही राणा विरुद्ध स्थानिक पोलीस असं चित्र उभं राहिलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना मिळालेलं हे सुरक्षा कवच बरंच काही सांगून जाणारं आहे.
काय असते वाय प्लस दर्जाची सुरक्षा?
- एक्स, वाय, झेड अशा एकूण सहा भागांमध्ये सुरक्षेचा दर्जा विभागला आहे
- वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेत एकूण 11 कमांडो तैनात असतात
- एसपीओ, एनएसजी कमांडो, सीआयएसएफचे बंदुकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ असा ताफा या सुरक्षेत असतो
- केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षेच्या धोक्याबाबत जे अहवाल मिळतात त्यावर केंद्रीय गृहमंत्रालय हे निर्णय घेत असतं
कंगना रनौत आणि राज्य सरकारमध्ये खटके उडत होते. त्यानंतर कंगनाला वाय प्लस सुरक्षा केंद्राकडून मिळाली. त्यानंतर किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारवर घोटाळ्यांचे आरोप करत होते. त्यांच्यावर पुण्यात हल्ला झाला, त्यानंतर केंद्र सरकारनं त्यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली. आता याच मालिकेत नवनीत राणा यांचाही नंबर लागला आहे
अमरावतीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन जो वाद झाला त्यात नवनीत राणा यांनी स्थानिक पोलिसांवर अपमानास्पद वागणूक दिल्याचे आरोप केले होते. लोकसभेत त्यांनी यावर हक्कभंग प्रस्तावही दाखल केला. राज्यातल्या बड्या अधिकाऱ्यांना त्यामुळे समितीसमोर चौकशीसाठी दिल्लीवारी करावी लागली होती. आता नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देऊन केंद्र सरकारनं जो राजकीय संदेश द्यायचा तो दिला आहे.