Nashik Vande Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) आज हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबई सीएसटीहून निघालेली वंदे भारत एक्सप्रेस नाशिकला केवळ दोनच मिनटे थांबणार असून लवकरच मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशी धावणार आहे. इगतपुरीला थांबा नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- शिर्डी (CST) वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. सीएसटी ते शिर्डी असा मार्ग असलेल्या वंदे भारत ही एक्सप्रेस पाच तास 20 मिनिटात पार करणार आहे. तर नाशिकरोड हे अंतर अवघ्या दोन तास 37 मिनिटांत पार करणार आहे. मात्र ही वंदे भारत एक्स्प्रेस इगतपुरीला न थांबता थेट नाशिकरोडला येणार आहे. शिवाय नाशिकरोडला (Nashikroad) केवळ दोनच मिनिटे थांबणार असल्याने प्रवाशांना उतरणे सोयीस्कर होणार नसल्याचे चित्र आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकला (Nashik) एखादी वंदे भारत एक्स्प्रेस मिळावे अशी तमाम रेल्वे प्रवाशांची मागणी होती. त्यानुसार मुंबई शिर्डी मार्गावर वंदे भारत सुरु होणार असल्याने नाशिककर यांचे स्वप्न काही प्रमाणात पूर्ण होणार आहे. मात्र दुसरीकडे या गाडीसाठी असलेल्या तिकीट दरामुळे देखील नाशिकमधून कितपत प्रतिसाद मिळेल, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. मुंबई ते शिर्डी हे 343 किलोमीटरचे अंतर असून सकाळी सव्वा सहा वाजता मुंबई सीएसटीवरुन सुटणारी गाडी शिर्डीला दुपारी साडेअकरा वाजता पोहोचणार आहे. तर तत्पूर्वी वंदे भारत एक्स्प्रेस नाशिकला सकाळी साडेआठच्या सुमारास पोहोचेल.
मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस दादर, ठाणे नाशिक आणि मनमाडला थांबणार आहे. त्यामुळे इगतपुरीतील प्रवाशांना या गाडीचा आनंद घेता येणार नाही. त्यांना या गाडीसाठी एक तर ठाण्याला जावे लागेल किंवा दादर नाशिकहून गाडीत बसता येईल. कसारा घाटातून गाडीची यशस्वी चाचणी झाल्यामुळे गाडीची डबल इंजिनची गरज नसल्याने वेळ वाचवण्यासाठी सांगितले जात आहे. राजधानी मुंबईला जागतिक वारसा असलेल्या तीर्थक्षेत्र नाशिक त्रंबकेश्वर शिर्डी या शहरांना जोडणारी ट्रेन ठरणार आहे कसारा घाटात बँकर शिवाय 37 मीटर ला एक मीटर उंच घाट चढणारी पहिली ट्रेन आहे. त्यामुळे मुंबई शिर्डी प्रवास पाच तास वीस मिनिटात होणार आहे.
असे आहे वेळापत्रक
सीएसटी शिर्डी ट्रेन सीएसटी स्टेशनवरुन सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुटेल. त्यानंतर दादरला सहा वाजून 30 मिनिटांनी, ठाण्याला सहा वाजून 49 मिनिटांनी, नाशिक रोडला आठ वाजून 57 मिनिटांनी तर शिर्डीला अकरा वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. तर सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी शिर्डीहून निघेल. नाशिक रोडला सात वाजून पंचवीस मिनिटांनी, ठाण्याला रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी, दादरला रात्री दहा वाजून 28 मिनिटांनी तर सीएसटीला दहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल.
नाशिक रोडला दोनच मिनिटे थांबणार..
मुंबईहून सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस गाडी सकाळी नाशिकला आठ वाजून 57 मिनिटांनी येईल. मात्र या ठिकाणी केवळ दोन मिनिटे थांबून ती आठ वाजून 59 मिनिटांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकावरुन शिर्डीकडे मार्गस्थ होईल.