Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) सध्या सावकारांचा त्रास वाढलेला असतानाच कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या आर्थिक अडचणीचा फायदा अवैध सावकारांनी उचलल्याचं धक्कादायक वास्तव एबीपी माझाच्या पाहणीत समोर आले आहे. नागरिकांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ नक्की का येते आहे? हे पाहणे महत्वाचे आहे.
नाशिक शहरात सध्या अवैध सावकारीला (Illegal moneylenders) ऊत आला आहे. सावकारी जाचाला कंटाळून गेल्या सात दिवसात चौघांनी आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे. सातपूर परिसरात 79 लाख रुपये डोक्यावर विविध कर्ज झाल्याने आणि सावकार वारंवार पैशांसाठी तगादा लावून धमकावत असल्याने फळव्रिक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शिरोडे कुटुंबातील वडील आणि दोन मुलांनी आपले जीवन संपवले होते. याप्रकरणी 21 सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उपनगर परिसरात मृतांच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनुसार, सावकार चाळीस लाख रुपयांची मागणी करुन त्रास देत असल्याने दोन भावांनी विष प्राशन केले. या घटनेत रवींद्रनाथ कांबळे या एका भावाचा मृत्यू झाला. दरम्यान सावकारांकडून नक्की कोणत्या प्रकारे छळ केला जातो की ज्यामुळे नागरिकांना थेट आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ येते आहे.
कशाप्रकारे छळ होतो, महिलांकडून धक्कादायक माहिती समोर
दरम्यान एबीपी माझाने काही महिलांशी संवाद साधल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहिली महिला म्हणाली की, "माझा नवरा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असताना यांनी माझ्या अकाऊंटमधून चेकद्वारे तीन लाख रुपये काढून घेतले. त्यांचे पूर्ण पैसे निल केले होते, त्यांना 50 हजारांचे एक लाख रुपये दिले होते. खूप त्रास होतो आहे. माझे मिस्टर उद्या जगतील की नाही, सांगू शकत नाही. खूप आजारी आहेत ते, आठवड्याला 20 हजार रुपये लागत आहेत. या लोकांनी मला खूप फसवले, माझे पैसे मिळायला पाहिजे." दुसरी महिला म्हणाली की, "व्याजासकट पैसे देऊन देखील हे लोकांना खूप त्रास देतात. कठोर पाऊल उचलायला पाहिजे, दहा हजारांचे 40 हजार भरले तरी ते अजून मागतात. घरी येऊन धमक्या देतात. वेळेवर पैसे नाही दिले तर रोजचे पाचशे रुपये दंड घेतात." तिसरी महिला म्हणाली की, "एक वर्षांपूर्वी त्यांच्याकडून पैसे घेतले होते. माझ्याकडून त्यांनी आधार कार्ड, दोन चेक आणि पॅन कार्ड घेतले होते. माझ्या नवऱ्याचा पण कोरा चेक घेतला होता. आमच्यासारख्या खूप महिला आहेत. घरी दरवाजात येऊन उभे राहतात आणि शिव्या देतात, माझी शिलाई मशीन पण घेऊन गेले आहेत. या महिलांसह इतर अनेक गरजूंनी अवैधपणे सावकारीचा धंदा करणाऱ्या दोघांकडून पैसे उसणे घेतले होते. मात्र हे पैसे देताना अनेक नियम आणि जाचक अटी त्यांना घालून देण्यात आल्या होत्या."
दरम्यान मोहिनी प्रकाश पवार आणि राजू शंकर पवार या दोघांविरोधात सहकार विभागाकडे तक्रार प्राप्त होताच दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर सहकार विभागाच्या पथकाने छापा टाकला. त्यांच्या घरातून एकूण 38 व्यक्तींचे चेक आणि कागदपत्र सापडले तर अनेकांच्या हात उसनवार पावत्या आणि कोरे चेकही दिसून आले. पोतेभर कागदपत्र त्यांनी जमा करत अंबड पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात सावकारी नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेत त्यांच्या या धंद्याला अधिक वेग आल्याचंही सहकार विभागाच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
VIDEO : Nashik Savkar Issue : सावकारांच्या जाचाला कंटाळून 7 दिवसात 4 जणांनी संपवलं जीवन ABP Majha
सापळा पथक प्रमुख प्रदीप महाजन यांनी केलेल्या पाहणीनुसार असे आढळून आले की, महिलांना जास्त फसवण्यात आले आहे. तिथे चेक बुक आणि इतर कागदपत्रांसह मासिक चाळीस टक्के ते व्याजदर आकारणी करत असल्याचं दिसले, हफ्ता नाही दिला तर दिवसाला पाचशे-हजार दंड ते आकारत होते. सावकारांकडून पैसे घेतलेले शक्यतो अडाणी आहे, गरीब घरातील आहेत. कोरोनाकाळात त्यांची आर्थिक क्षमता नाजूक झाल्याने त्यांनी सावकाराकडे धाव घेतल्याचं प्राथमिक दिसून येते, या काळातच अनेकांनी सावकरांकडून पैसे घेतले आहे. या आरोपींनी अंदाजे दोन ते अडीच वर्षांपासून हे काम सुरु केल्याचे दिसते.
नागरिकांनी तक्रार द्यायला पुढे यावं...
नाशिकमध्ये सावकारी बोकाळली असून याविरोधात शासनाच्या सावकार निबंधकांकडूनही आता कठोर पाऊलं उचलली जात आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी 273 अधिकृत सावकारांची नोंद त्यांच्याकडे झाली असून अवैध सावकारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते आहे. नागरिकांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये आणि न घाबरता तक्रार देण्यास पुढे यावं असं आव्हान त्यांच्याकडून केलं जात आहे. नाशिक जिल्हा गेल्या वर्षात जवळपास 95 तक्रारी आपल्याकडे आल्या. त्यातील 22 ठिकाणी आपण छापे टाकत कारवाया केल्या. नागरिकांनी टोकाचे पाऊल उचलू नये तक्रार द्यायला पुढे यावं, असं आवाहन नाशिक जिल्हा सावकार निबंधक सतीश खरे यांनी केले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये अनेकांवर आर्थिक संकट कोसळल आणि याच संधीचं सोनं सावकारांनी केल्याचं समोर आलं असून असे अजून राज्यभरात किती सावकार नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. याचा शासनाने शोध घेणं गरजेचं आहे. या अवैध सावकारीवर आळा बसवण्यासाठी नाशिक पोलीस आता कशी कारवाई करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
अशी केली जातेय पिळवणूक
ज्या तारखेला पैसे घेतले त्याच दिवशी सकाळी 11 ते 5 या वेळेत हफ्ता घेतला जाईल. उशीर झाल्यास प्रत्येक दिवशी एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. नोटरीसाठी पंधराशे रुपये वेगळे द्यावे लागतील, ज्याने पैसे घेतले आहे, त्याच कर्जदाराला आमच्याशी बोलण्याचा अधिकार राहील. पैसे बुडवले तर पोलिसांमार्फत कायदेशीर कारवाई केली जाईल. पैसे घेतानाच नियम आणि अटी वाचून घ्या, नंतर कुठलीच तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. अशा पद्धतीचे नियम अटी कर्जदाराला सावकारांकडून घालून दिल्या जातात आणि यानंतर सावकारीचा फास कर्जदाराच्या गळ्याभोवती बसतो.