Sanjay Raut : दौंड तालुक्यात शिवसेना (Shivsena) खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आभाराचे बॅनर लावण्यात आले आहेत. संजय राऊत यांनी 13 मार्चला भाजपचे आमदार आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल (Rahul Kul) यांच्यावर कथित 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात दौंड (Daund) शहरात मोर्चा निघाला होता. त्यानंतर दौंड तालुक्यात संजय राऊतांच्या आभाराचे बॅनर लागले आहेत.  


कर नाही तर डर कशाला चौकशीला सामोरे जा


आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी राऊत यांनी केलेले हे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा कुल यांच्या कार्यकर्त्यांना केला आहे. राऊत यांच्याविरोधात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो, पुतळ्याचा दहन करुन निषेध नोंदवला होता. आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी दौंड तालुक्यात मोर्चा देखील काढला होता. मात्र, त्याला प्रत्युत्तर म्हणून खासदार संजय राऊत यांच्या आभाराचे फलक सध्या दौंड तालुक्यात झळकले आहेत. राऊत यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मालकीच्या असलेल्या भीमा पाटस सहकार कारखान्याच्या 500 कोटींच्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला वाचा फोडली आहे. कर नाही तर डर कशाला चौकशीला सामोरे जा, ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या वतीनं जाहीर आभार, अशा अशयाचे बॅनर शेतकरी सभासदांनी दौंड शहरात ठिकठिकाणी लावले आहेत. तसेच पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देखील बॅनर लावले आहेत. 


बॅनर नेमके लावले कोणी, चर्चांना उधाण


दौंड शहरात लावलेल्या बॅनरवर जरी भीमा पाटसचे सुज्ञ शेतकरी म्हटले असेल तरी हे बॅनर कुणी लावले हे मात्र गुलदस्त्यात आहे. त्याचे कारण भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी आमदार राहुल कुल यांच्याविरोधात कारखान्यात अनियमितता असल्याची तक्रार केली आहे. एकीकडे आमदार कुल यांच्या समर्थकांकडून खासदार राऊत यांचा निषेध सुरु आहे तर दुसरीकडे खासदार राऊत यांच्या आभाराचे बॅनर लागल्याने तालुक्यात भीमा पाटसच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा राजकारण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


संजय राऊतांचे फडणवीसांना पत्र 


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. राहुल कुल चेअरमन असलेल्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांची लूट झाली असून 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


आमदार राहुल कुल यांच्या भीमा साखर कारखान्यात गैरव्यवहार, 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र