Nashik ACB : राज्याच्या गृह विभागाने सोमवारी 104 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. या देशाला 24 तास पूर्ण होत नाही तोच पुन्हा सोमवारी शासनाचे नावे आदेश येऊन धडकला. या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त शर्मिष्ठा घाडगे वालावलकर (Sharmistha Valavalkar) यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांची नाशिकच्या (Nashik) लाचलुचपत प्रतिबंधक विभागात करण्यात आलेल्या बदलीला स्थगिती मिळाली आहे.
सोमवारी राज्य शासनाने गृह विभागाच्या (Home Minister) भापोसे व मपोसे पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले. यानुसार नाशिक आयुक्तालयांचे दोन उपायुक्त लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी मधील दोन उपायुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्या आदेशात राज्य गुप्तवार्ता विभागाच्या वालावलकर यांची नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदी बदली करण्यात आली. तसेच तात्कालीन अधीक्षक सुनील कडासने यांची नागपूर येथील लोहमार्ग पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. या बदली आदेशातील नऊ अधिकारी यांची बदली होऊ नये, आहे त्या ठिकाणी पदावर पुढील आदेश येईपर्यंत जैसे थे राहावे लागणार आहे.
दरम्यान यामुळे पोलीस अधिकाऱ्यांचा काहीसा हिरमोड झाला आहे. या नऊ अधिकाऱ्यांमध्ये प्रशांत मोहिते, नम्रता पाटील, संदीप डोईफोडे, दीपक देवराज, सुनील लोखंडे, प्रकाश गायकवाड, तिरुपती काकडे, योगेश चव्हाण व शनिष्ठा वालावलकर यांचा समावेश आहे. या सर्वांना वगळून अन्य 95 पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या नियंत्रक अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यमुक्त करत नवीन ठिकाणचा पदभार घेण्याच्या आदेश अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार सिंगल यांनी काढले आहेत. आदेश काढताना नियंत्रक अधिकाऱ्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण व न्यायालयाच्या आदेश आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असा स्पष्ट करण्यात आले आहे.
नाशिकच्या एसीबीचे सूत्रे कुणाकडे?
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक कडासने यांची बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या जागी शर्मिष्ठा वालावलकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर सुनील कडासने यांनी आदेशानुसार नवीन ठिकाणी पदभार स्वीकारत कामाला सुरवात केली मात्र इकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रिक्त पदाच्या जागेवर नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्यासह नाशिक विभागाचे लक्ष लागले आहे. कारण शर्मिष्ठा वालावलकर यांच्या या पदावर बदली होऊनही त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये, असे सोमवारी अप्पर महासंचालकांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे.