Deepali Sayyad: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा करणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी आज शिंदे गटात प्रवेश (Eknath Shinde Faction) करण्याचे संकेत दिले. वर्षा बंगल्याबाहेर माध्यमांशी संवाद साधताना दीपाली सय्यद यांनी शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Nilam Gorhe), सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर (Rashmi Thackeray) दीपाली सय्यद यांनी टीका केली. मुंबई महानगरपालिकेचे (BMC) खोके वेळेवर मातोश्रीवर पोहचत नसल्याची खंत रश्मी वहिंनीना असल्याचे टीकास्त्र दीपाली यांनी सोडले.
दीपाली सय्यद यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला होता. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दीपाली सय्यद यांच्याकडून शिवसेनेच्या कार्यक्रमात हजेरी लावण्यात येत होती. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणणार असून त्यांची बैठक आयोजित करणार असल्याची घोषणा दीपाली सय्यद यांनी केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर पक्ष प्रवेशाबाबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. मला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणले होते. त्यामुळे आता त्यांना साथ देणार असल्याचे सय्यद यांनी सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीत दीपाली सय्यद यांनी मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी दीपाली सय्यद यांना 33,644 मते मिळाली होती. तर, जितेंद्र आव्हाड यांना 1,09,283 मते मिळाली होती.
बीएमसीचे खोके नसल्याने रश्मी ठाकरेंना खंत
यावेळी दीपाली सय्यद यांनी नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे, संजय राऊत यांच्यावर टीका केली. नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे हे चिल्लर आहेत. खोक्यामागील सूत्रधार रश्मी ठाकरे असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई महानगरपालिकेमधून येणारे खोके वेळेवर मातोश्रीवर पोहचत नाहीत. याची खंत रश्मी वहिनींना जाणवत असल्याचे दीपाली सय्यद यांनी म्हटले.
राऊतांनी तोंडाने पक्ष फोडला
दीपाली सय्यद यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. तोंडाने पक्ष कसा फोडायचा याचे उत्तम उदाहरण संजय राऊत आहेत. संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळत असल्याची टीका दीपाली सय्यद यांनी केली.