Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) आज राज्यातील अर्धा डझन मंत्र्यांची उपस्थिती राहणार असून शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल असल्याने केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील मंत्री उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे आज नाशिक शहरात राजकीय नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा समावेश असणार आहे.
आज नाशिक शहरात विविध पक्षाचे, संघटनेचे काही खासगी कार्यक्रम असून या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेत्यांची हजेरी लागणार आहे. यात सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे दोन एकरमध्ये ‘गोपीनाथ गड’ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, तर पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत. तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी नाशिक दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत तोफखाना केंद्राचे शस्त्र प्रदर्शन तसेच गोपीनाथ गडचे लोकार्पण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री दोनच कार्यक्रमांना हजेरी लावणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्या हस्ते गोल्फ क्लब इदगाह मैदानावर नो युवर आर्मी या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. त्यानंतर दुपारी 12.15 वाजता दोघांच्या उपस्थितीत सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गोपीनाथ गडाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री या दोनच कार्यक्रमांना हजेरी लावणार असले तरी नितीन गडकरी यांचे विविध कार्यक्रम दिवसभर होणार आहेत.
सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत कार्यक्रम
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज दिवसभर शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्यानुसार सकाळी नो युवर आर्मी प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर ते पंचवटीत जाणार असून आरटीओ कार्यालयासमोरील नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या आरएमडी कार्डियाक सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते सकाळी 10.10 वाजता करण्यात येईल तर त्यानंतर 11 वाजता महाकवी कालिदास कला मंदिरात नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या ऑटो अँड लॉजिस्टिक एक्स्पोचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथील कार्यक्रमास ते उपस्थित राहतील तेथून परतल्यानंतर सायंकाळी 5 वाजता ते श्री गुरुजी रुग्णालयाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. श्री गुरुजी रुग्णालयाच्या वतीने सेवा सदन उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर मोहाडी येथे सह्याद्री फार्मर्स येथे आयोजित पुरस्कार वितरण सायंकाळी 7 वाजता गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.