Trimbakeshwer News : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील पहिनेजवळील चिखलवाडी येथील सर्वहरा परिवर्तन केंद्र या ठिकाणी असलेल्या शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनींना बळजबरीने नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिक (Nashik) शहरात वास्तव्यास असलेल्या राजू उर्फ वादीराज भीमराज नाईक आणि शिक्षिका माधुरी गवळी यांच्या विरोधात मुलींच्या पालकांनी फिर्याद दिल्याने वाडीव-हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


त्र्यंबकेश्वर जवळील पहिने परिसर (Pahine) हा पर्यटनासाठी म्हणून ओळखला जातो. या परिसरात असंख्य रिसॉर्ट मागील वर्षात उभे राहिले असून नाशिकसह राज्यातील अनेक पर्यटक रिसॉर्टला भेटी देत असतात. रात्रपार्ट्याना ही जोरात सुरु असतात. मात्र प्रशासनानेचे याकडे सर्रास दुर्लक्ष असल्याचे या प्रकरणावरून समोर आपले आहे. पहिनेजवळील सामुंडी येथे सर्वहरा परिवर्तन केंद्र (Sarvhara Parivartan Kendra) या खासगी शिक्षण संस्था म्हणून सांगितले जात असलेल्या या संस्थेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलींना पर्यटंकासमोर नाचविण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून संबंधित संस्था चालकाविरुद्ध वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नाशिकच्या (Nashik) सिडको येथील मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचण्यास सांगितले जात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षिका माधुरी गवळी मुलींना छडीने मारहाण करून दमदाटी आणि जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेचा संपूर्ण तपास नाशिक ग्रामीण उपअधिक्षक संदीप भामरे यांच्याकडे देण्यात आला आहे. एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आणि महिला बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. महिला बाल हक्क आयोगाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत अशी माहिती मधे यांनी दिली.


संगणक आणि नृत्य प्रशिक्षणाच्या नावाखाली 


पहिने येथे एका खासगी संस्थेची काही वर्षांपासून ही इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. या शाळेला जोडून यंदा मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. शाळा सुरू होण्यास पंधरा दिवसांचा अवधी असताना वसतिगृहात सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना 31 मे 2023 पासूनच प्रवेश देण्यात आला. सुट्टीत पारंपरिक नृत्य आणि संगणक शिक्षण दिले जाणार असल्याचे संस्थेने सांगितले होते. प्रत्यक्षात संगणक शिक्षण दिले नसल्याचा आरोप मुलींनी केला. संस्थेची सहावीपर्यंतच शाळा असल्याने या मुलींना त्र्यंबकेश्वर येथील शाळेत शिक्षणासाठी पाठविले जाते. महत्वाचे म्हणजे, या शाळेला कोणतीच मान्यता असून स्थानिक आदिवासी गरीब कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा संस्थाचालक फायदा घेत असल्याचे वास्तव  समोर आले आहे.