Nashik Satyajit Tambe : नाशिक (Nashik Padvidhar Election) पदवीधर निवडणुकीत माघारीचा दिवस देखील संपला, मात्र अद्यापही कोण कोणाला पाठिंबा देतंय, याबाबत अद्यापही साशंकता आहे. असं असताना राजकीय वर्तुळात टीकेचे धनी बनलेले सत्यजीत तांबे मात्र अडचणीत सापडले आहेत. अशातच सोशल मीडियावर सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या संदर्भातील एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
सत्यजीत तांबे हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यापासून नाशिक (Nashik), मुंबई आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील युवकांचे नेतृत्व ते करतात. तसेच सोशल मीडियावर देखील ते अॅक्टिव्ह असतात. अशातच नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी पक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि तांबेंच्या अडचणीत वाढ होण्यास सुरुवात झाली. वडील सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारुन सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज भरला. मात्र त्यानंतर काँग्रेसने जाहीर केलेली उमेदवारी पाण्यात गेल्याने काँग्रेस पक्ष श्रेष्ठी चांगलेच नाराज झाल्याचे दिसून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पाठिंबा देण्याचे नाकारले.
त्यानंतर वडील सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर आता स्वतः सत्यजीत तांबे यांचे निलंबन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्यजीत तांबे माघार घेणार का? सत्यजीत तांबे हे भाजपच्या वाटेवर आहेत? अशाप्रकारचे सवाल उपस्थित होत आहेत. मात्र माघारीची वेळ संपली. मात्र सत्यजीत तांबे हे अद्यापही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. सद्यस्थितीत सत्यजीत तांबे यांच्या नावाने सोशल मीडियावर भावनिक करणारी पोस्ट व्हायरल होत आहे.
चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल...
"जी माणसं माझ्या कठीण काळात माझ्याबरोबर असतील, त्यांना माझा शब्द आहे. माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल, अशा आशयाची पोस्ट असून खाली सत्यजीत दादा तांबे पाटील असे लिहिले आहे. एकूणच नाशिक पदवीधर निवडणूक माघारीचा शेवटचा दिवस असून सत्यजीत तांबे प्रचारात व्यस्त आहेत. संगमनेरातील निवासस्थानातून नुकतेच बाहेर पडले असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. कुठे जाणार, कुणाला भेटणार याबाबत गुप्तता असून एकूणच सत्यजीत तांबे हे जणूकाही एकटे पडल्याचे चित्र आहे, अशा आशयाचा मजकूरही पोस्टसोबत आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
कोण आहेत सत्यजीत तांबे?
सत्यजीत सुधीर तांबे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख युवा नेते आहेत. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. युवक काँग्रेस ही जगातील सर्वात मोठी आणि जुनी लोकशाही युवा संघटना आहे. ते युवा राजकारणात खूप सक्रिय आहेत आणि जास्तीत जास्त तरुणांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर त्यांचा भर आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.