Nashik Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. नाशिकमध्ये मनसैनिकांनी एकत्र येत आंदोलन केले आहे. हल्ले करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार असा इशारा आंदोलक मनसैनिकांनी दिला आहे. नाशिक (Nashik) शहरातील मनसेच्या राजगड कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले आहे. 


मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी सात वाजेच्या सुमारास मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क परिसरात प्राणघातक हल्ला झाला. देशपांडे हे मॉर्निंग वॉकला गेले असताना अज्ञात संशयितांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहे. या हल्ल्यांनंतर महाराष्ट्रभर खळबळ माजली आहे. देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विधानभवनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. आता नाशिक शहरात देखील मनसे कार्यकर्त्यांकडून (MNS Protest) आंदोलन करण्यात आले आहे. 


नाशिक शहरातील मनसेच्या राजगड कार्यालयासमोर एकत्र येत आंदोलन केले आहे. यावेळी हातात बॅट, लाकडी दांडे आणि स्टंप घेत मनसैनिकांनी आंदोलन केले. त्याचबरोबर देशपांडे यांच्यावर हल्ले करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा मनसैनिकांनाकडून देण्यात आला आहे. यावेळी आंदोलन दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान या हल्ल्यात संदीप देशपांडे यांना हाता-पायाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना डिश्चार्जही देण्यात आला आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, भाजप आमदार नितेश यांनी हिंदुजा रुग्णालयात भेट घेतली. 


मॉर्निंग वॉकला गेले असताना... 


मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे सध्या सुखरुप आहेत. त्यांना थोडा मार लागला आहे. त्यांनी उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिवाजी पार्क पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 


राज्यभरात मनसैनिक आक्रमक 


दरम्यान संदीप देशपांडे यांच्यावरील झालेल्या हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. परिणामी दादर परिसरात तणावाचं वातावरण आहे. हा राजकीय हल्ला असल्याचा आरोप केला जातो. संदीप देशपांडे यांना गप्प करण्यासाठी हा हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे. संदीप देशपांडे यांच्यावर कोणी हल्ला केला, हे समजू शकलेलं नाही. शिवाजी पार्क पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.