Maharashtra Weather Update : सध्या तापमानात (Temperature) सातत्याने चढ-उतार होत असल्याचं चित्र दिसत आहे. पहाटे थंडीचा कडाका (Cold Weather) तर दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. बदलत्या तापमानाचा शेती पिकांवर (Agriculture crop) देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, या चालू मार्च महिन्यात तापमान कसे राहणार? उन्हाळ्याच्या पुढच्या तीन महिन्यात तापमानाची स्थिती काय असणार? याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. 


मार्च महिना 


महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग, नाशिक अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर सांगली, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा गोंदिया या जिल्ह्यात मार्च 2023 महिन्याचे दुपारचे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरी तापमान  किंवा त्यापेक्षा खाली असण्याची शक्यता 55 टक्के जाणवते. 


संपूर्ण उन्हाळ्याचे तीन महिने कसे जाणार 


संपूर्ण 2023 च्या उन्हाळ्यातील तीन महिन्यात मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान हे एकूण तीन महिन्याच्या सरासरीइतके तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 45 टक्के जाणवते. 


पहाटे पाच वाजताचे किमान तापमान


मार्च महिना महाराष्ट्रातील लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात मार्च महिन्याचे पहाटेचे किमान तापमान हे मार्च महिन्याच्या सरासरी इतके राहिल. तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 45 टक्के जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली.                


उन्हाळ्यात पहाटेचे तापमान 


संपूर्ण उन्हाळ्यात तीन महिने पहाटेचे किमान तापमान सोलापूर, मराठवाडा, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात तीन महिन्यांच्या सरासरी इतके राहणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 45 टक्के जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली.  


उष्णतेच्या लाटेची शक्यता


मुंबईसह संपूर्ण कोकण विभागातील 12 जिल्ह्यात मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता 45 टक्के जाणवते. तर संपूर्ण उन्हाळ्याच्या तीन महिन्यात 65 टक्के जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.  


मार्च महिन्याचा पाऊस


मार्च 2023 महिन्यात नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पावसाच्या सरासरीपेक्षा कमी असण्याची तर उर्वरित जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता 45 टक्के अधिक जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. 


या आठवड्यातील पावसाची स्थिती


देशाच्या वायव्य राजस्थान तसेच दक्षिण पाकिस्तान दरम्यानची दीड किमी उंचीपर्यंत चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे पुढील पाच दिवस नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता अधिक आहे. क्वचितच तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक घाबरुन न जाता शेतकामाच्या नियोजनात सावधानता बाळगावी असे आवाहन खुळे यांनी केलं.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather : महाराष्ट्रात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज; उन्हाचा चटका कमी होणार का?