नांदेड : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून ती आज नांदेडमधील देगलूर या ठिकाणी पोहोचली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या हाती मशाली (Congress Mashal Yatra) घेतल्या होत्या. देगलूर नाक्यावर ही मशाल यात्रा आल्यानंतर राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यात्रा गुरुद्वाराच्या दिशेने जाणार आहे. 


तेलंगणामध्ये एका ठिकाणी कार्यकर्त्यांच्या हाती मशाली दिसल्या होत्या. पण काँग्रेसची आजची मशाल यात्रा ही भव्य अशीच होती. स्वत: राहुल गांधी यांनी हाती मशाल घेतली होती. त्यांच्यासोबत हजारो युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांच्या हाती मशाली दिसल्या. 


राहुल गांधी यांना पाहण्यासाठी नागरिकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. नागरिक बॅनर, झेंडे आणि राहुल गांधी यांची प्रतिमा हाती घेत यात्रेच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होते. देगलूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. 


महाराष्ट्रात 14 दिवस मुक्काम


काँग्रेसची  भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली, ती श्रीनगर येथे संपणार आहे. ही यात्रा एकूण 3500 किमीचा प्रवास करणार आहे. कन्याकुमारी, तामिळनाडू, कर्नाटक असा प्रवास केल्यानंतर ही पदयात्रा आता महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. 


राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14  दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. काँग्रेसच्या या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत.


महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेत्या रजनी पाटील, सुशिलकुमार शिंदे, जयराम रमेश, एच के पाटील, माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण , भाई जगताप, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात आणि प्रमुख नेते सामिल होणार आहेत. 


यात्रेचे दिवसभरातील नियोजन कसे असते? 



  • सकाळी सहा वाजता सेवा दलाच्या ध्वजवंदनानंतर यात्रा सुरु होते  

  • सकाळी सहा ते साडेदहा वाजेपर्यंत 15 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करुन विश्रांती.

  • संध्याकाळी चार ते साडेसहा दरम्यान दहा किलोमीटर ही यात्रा चालते.

  • शेवटी एक कॉर्नर सभा होते, त्यानंतर मुक्काम.