Shrikant Shinde On Aaditya Thackeray: खासदार श्रीकांत शिंदे औरंगाबादच्या सिल्लोड दौऱ्यावर असून, त्यांची जाहीर सभा सिल्लोडच्या जिल्हा परिषदेच्या मैदानात झाली. यावेळी बोलतांना श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आजारी असल्याने रुग्णालयात होते, मात्र तेव्हा युवराज कुठे होते, कोणत्या ठिकाणी पर्यटन करत होते असा खोचक टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. 


यावेळी बोलतांना श्रीकांत शिंदे म्हणाले की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिल्लोड गाजत होतं, सिल्लोड मध्ये काय होणार याची चर्चा सुरु होती. सिल्लोड शहरात दोन जाहीर सभा होणार होत्या, मात्र आज एकच होत आहे. आम्हाला परवानगी देत नसल्याचा मोठा गाजावाजा केला. त्यामुळे त्यांना सभेसाठी जागा, मंडप,खुर्च्या,टेबल सगळं काही देण्याचं आम्ही म्हणालो. एकदा सिल्लोडच्या लोकांना कळू द्या असेही मी म्हणालो होतो. पण आज पाहिलं तर कुठेतरी कॉर्नर सभा सुरू आहे. यासाठी बाहेरून इकडून तिकडून लोकं आणली जातायत अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली. 


बांधावर येण्याचा तुम्हाला अधिकार नाही...


पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, यापूर्वी दहा मिनिटात दौरा आटोपला होता. आता तो वेळ वाढवून 20-25 मीनटांवर आला आहे. बांद्रा ते वरळी एवढेच जग आणि एवढी संघटना असलेल्या लोकांना आज बांधावर जावं लागतंय. पण बांधावर जाऊन मला शेतीचं काहीच कळत नसल्याचं सांगतायत.  त्यामुळे शेतकऱ्यांचे  दुःख कळत नसेल तर बांधावर येण्याचा तुम्हाला अधिकार नाही. जेव्हा सर्व यंत्रणा होती तेव्हा बांधावर आले नाही. बांधावर जाताय पण शेतात काय पिकवलं जाते एवढं तरी माहित आहे का?, हातात कंस दिली तर ज्वारीचं कोणतं आणि मक्याचं कोणतं हे सुद्धा सांगू शकणार नाही, असा खोचक टोलाही शिंदे यांनी यावेळी लगावला. 


यामुळे गाजतेय सभा...


ज्या सिल्लोड शहरात श्रीकांत शिंदे यांची सभा होत आहे, तिथेच आदित्य ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. एकाच दिवशी आणि एकाच वेळी या दोन्ही नेत्यांची सभा होत असल्याने गेल्या आठवड्याभरापासून या याची चर्चा पाहायला मिळत होती. तर या काळात दोन्ही गटातील नेत्यांकडून एकेमकांवर टीका होतांना देखील पाहायला मिळाले.


पावसाळा संपल्यावर 'आदित्य' काय पाहणी करणार म्हणणारे सत्तार श्रीकांत शिंदेंसह बांधावर पोहचले