Nashik News : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात एसीबीची दिवसाआड कारवाई होत असताना मात्र अधिकारी वर्ग रोजरोसपणे लाच घेत असल्याचे चित्र आहे. एकीकडे कारवाई होत असताना दुसरीकडे मात्र लाच घेणाऱ्या अधिकारी वर्गाचा आलेख हा उंचावतच आहे. याला आळा बसणे महत्वाचे असताना आता पुन्हा जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधकास (District Deputy Registrar) तीस लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. 


नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक (Nashik ACB) विभाग गेल्या अनेक दिवसांपासून धडक कारवाया करत आहेत. मात्र अधिकारी वर्गाचे धाबे दणाणण्याऐवजी एक दिवस होत नाही तोच दुसरा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडत आहे. यात शिपायापासून ते मोठ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत हे जाळे वाढत चालले आहे. तसेच पाचशे रुपयांपासून ते तीस लाखांपर्यंत लाच स्वीकारल्याचे आतापर्यंतच्या घटनांवरुन अधोरेखित होत आहे. आता अशातच जिल्ह्यातील (Nashik District) सर्वात मोठी कारवाई एसीबीने केल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील लाखाे सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासह आवश्यक परवानग्या आणि निवडणुका लावणाऱ्या जिल्हा उपनिबंधक सतिष भाऊसाहेब खरे यांना 30 लाख रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. खरे यांनी काॅलेजराेडवरील 'आई' या निवासस्थानी ही लाच स्वीकारली असून त्यांच्या वकिलाला अटक झाली आहे.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील एका बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर आणि वैधपणे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी आणि निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा वकील सभद्रा यांनी तब्बल 30 लाख रुपयांची लाच मागितली होती. संबंधित लाचेची रक्कम घेऊन खरे यांनी तक्रारदारास सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे आणि त्यांच्या साथीदारास लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. 


घरझडती सुरु


सोमवारी रात्री उशिरा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. खासगी सावकारीविराेधी प्रलंबित अर्ज, रेंगाळलेली दस्तनोंदणी यासह अनेक कामे प्रलंबित ठेवत 'मध्यस्थी'च्या मार्फत आर्थिक व्यवहार असणाऱ्या उपनिबंधक कार्यालयातील गैरव्यवहार यातून उघड झाला. दरम्यान विभागाचे अपरधीश नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली खरे यांच्या कॉलेज रोडवरील निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत झडती सुरु होती. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. संबंधित कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे, उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, अजय गरुड यांनी केली.