16th May In History: भारताच्या इतिहासाच्यादृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी पुरंदरच्या किल्ल्यावर मुघल सैन्याशी दोन हात करताना मुरारबाजी यांना वीरमरण आले. तर, स्वातंत्र्योत्तर काळात अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या नाकावर टिच्चून भारताने सिक्कीम राज्याचे विलिनीकरण केले. सांस्कृतिक क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिन आहे. तर, साहित्यातले 'फौजदार' अशी ओळख असलेले साहित्य समीक्षक माधव मनोहर यांचे निधन झाले. 



1665: पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्‍नात मुरारबाजी यांचा मृत्यू


1665 साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्यांनी मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मोगलांचा वेढा फोडताना 16 मे १६६५ रोजी त्यांना वीरमरण आले. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांशी झडलेल्या संघर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांना मोऱ्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजींच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर शिवाजी महाराजांनी मुरारबाजी यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले. 


मोगल सम्राट औरंगजेबाने स्वराज्याविरोधात सरदार मिर्झाराजे जयसिंह यांना महाराष्ट्रात पाठवले होते. मिर्झाराजांच्या आक्रमणासमोर मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते. या नामुष्कीची चाहूल लागताच शिवाजी महाराजांनी मिर्झाराजांसोबत बोलणी सुरू केली पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही. त्यानंतर मोगल सरदार दिलेरखानाने 1665 साली पुरंदरला वेढा घातला. मुरारबाजींनी गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली. या कठीण परिस्थितीमधेदेखील मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदर फार शर्थीने लढवला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजींना या लढाईत वीरमरण आले. 


1899: क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी


19व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्याचे ब्रिटीश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड यांची हत्या करण्यात दामोदर, वासुदेव आणि बाळकृष्ण चाफेकर या क्रांतीकारी बंधुंचा सहभाग होता. पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता.  पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. रॅंडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवले. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला आणि त्यातून चाफेकर बंधूंनी रँड यांची हत्या केली. 


दामोदर चाफेकर यांना मुंबईत अटक झाली आणि 18 एप्रिल 1898 रोजी येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेव यांना 8 मे 1899 आणि बाळकृष्ण चाफेकर यांना 16 मे 2899 रोजी फाशी देण्यात आली. 


1926: सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका माणिक वर्मा यांचा जन्म


हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीतप्रकारांत गायन करणाऱ्या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत असे. मराठी भाषेतील गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल 1974 साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. गीतरामायणातील काही गाणी माणिक वर्मांच्या आवाजात होती. 


माणिकबाईंचा विवाह अमर वर्मा यांच्याशी झाला. राणी वर्मा, अरुणा जयप्रकाश, अभिनेत्री भारती आचरेकर आणि अभिनेत्री वंदना गुप्ते या त्यांच्या चार कन्या होत. 


1929: ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात


हॉलिवूडच्या अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्‌स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.


1975: सिक्कीमचे भारतात विलिनीकरण 


सिक्कीम हे भारताच्या ईशान्यकडील लहान परंतु सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. जनमत संग्रहाद्वारे सिक्कीम भारतात विलीन झाले. सिक्कीम हे स्वतंत्र संस्थान होते. अमेरिकेकडून गुप्तचर संस्था सीआयएकडून सिक्कीमला स्वतंत्र ठेवत आपलं अंकित ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. भारताला याची कुणकुण लागताच भारताने तातडीने पावले उचलली. सिक्कीमच्या सीमेवर चीनचे सैनिकही तैनात होते. सिक्कीमचा भूभाग हा संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, त्यामुळे तो भारताच्या ताब्यात असावा असा प्रस्ताव 'रॉ'चे प्रमुख रामेश्वर काव यांनी इंदिरा गांधी यांच्यासमोर मांडला. 


इंदिरा गांधींनी हिरवा सिग्नल दिल्यानंतर रामेश्वर काव यांनी केवळ तीन अधिकाऱ्यांच्या मदतीने काम सुरू केलं. हे ऑपरेशन इतकं गुप्त होतं की या चौघांच्या व्यतिरिक्त कुणालाही याची कल्पना नव्हती. 27 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर 16 मे 1975 रोजी सिक्कीमचे भारतात विलिनीकरण करण्यात आलं. या घटनेमुळे अमेरिका आणि चीनला मात्र मोठा धक्का बसला होता. 


1994 : साहित्य समीक्षक माधव मनोहर यांचे निधन


माधव मनोहर हे मराठी समीक्षक, नाटककार, लेखक होते. इंग्रजीतले चांगले वाङ्‌मय मराठीत आणण्याचा त्यांनी सपाटा लावला. दैनिक केसरीत ’चौपाटीवरून’ या सदरात, व ’सोबत'मध्ये ’पंचम' या सदरातून ते नाट्यसमीक्षणे लिहीत असत. ’नवशक्ती’, ’रत्‍नाकर, ’रसरंग’मधूनही त्यांचे समीक्षालेख प्रकाशित होत. त्यांचे स्वतःचे साहित्य आहे त्यापेक्षा त्यांचे समीक्षासाहित्य अधिक आहे, त्यामुळे माधव मनोहर हे नाव साहित्यिकांच्या पंक्तीतून समीक्षकांच्या पंक्तीत जाऊन बसले. माधव मनोहर यांचे वाचन अफाट होते, त्यामुळे ते साहित्यातील चोऱ्या सहज पकडत. वाङ्‌मयचौर्य पकडण्याच्या त्यांच्या या कामामुळे त्यांना ’साहित्यातले फौजदार’ म्हणत. 



इतर महत्त्वाच्या बातम्या:


1905: अमेरिकन अभिनेते हेन्‍री फोंडा यांचा जन्म


1969: सोविएत रशियाचे व्हेनेरा-5 हे मानवविरहित अंतराळयान शुक्रावर उतरले.


1975: जपानची जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.


2005: कुवेतमधे स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.