Chhatrapati Sambhaji Nagar News : गेल्या काही दिवसांत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किरकोळ कारणावरुन दोन गटांमध्ये वाद होण्याच्या घटना सतत घडताना पाहायला मिळत आहेत. तर काही ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना देखील समोर आल्या आहेत. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर इतर जिल्ह्यात घडत असलेल्या घटनांचे पडसाद छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) उमटू नयेत, तसेच पोलिसांची तत्परता दिसून यावी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी अलर्ट जारी केला आहे. नुकतेच त्यांनी सर्व ठाणे प्रमुखांची बैठक घेतली आहे. येणाऱ्या काळात पोलिसांनी अलर्ट राहावे त्यासंदर्भातील सूचना लोहिया यांनी दिल्या. त्याचबरोबर शहराच्या सुरक्षेसाठी व खबरदारीचा उपाय म्हणून एसआरपींच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या दोन्ही ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. दोन्ही ठिकाणी दोन गट आमने-सामने आल्याने जोरदार दगडफेक करण्यात आली. ज्यात अकोल्यात एकाचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. तर काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. त्यामुळे अशा घटनांचे पडसाद छत्रपती संभाजीनगर शहरात उमटू नयेत, म्हणून शहर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी अलर्ट जारी केला आहे. तर शहरातील सर्व पोलीस ठाणे प्रमुख यांची बैठक घेऊन, येणाऱ्या काळात पोलिसांनी अलर्ट राहावे त्यासंदर्भातील सूचना लोहिया यांनी दिल्या आहेत.
शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून अतोनात प्रयत्न
राम नवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन झालेल्या वादाचे रुपांतर पुढे हिंसाचारात झाले. त्यामुळे शहरातचा इतिहास पाहिला असता किरकोळ कारणावरुन टोकाचे वाद झालेले आहेत. अति संवेदनशील शहर म्हणून या शहराची शासनाच्या दरबारी नोंद झालेली आहे. त्यामुळ शहरातील छोट्या-मोठ्या घटना घडामोडींकडे पोलिसांनी तत्परता दाखवणे गरजेचे आहेत. किराडपुरा भागात झालेल्या राड्यात अनेक पोलीस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले होते. पोलिसांची 13 मोठी वाहने जाळण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांना येणाऱ्या काळात बारकाईने प्रत्येक घटनांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे शहरातील शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून अतोनात प्रयत्न करण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. रात्रीच्या गस्त वाढविण्यात आल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
अहमदनगरच्या शेवगावमध्ये दोन गटांत राडा; अनेक वाहनांचं मोठं नुकसान, परिस्थिती नियंत्रणात