Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातून (Nashik District) काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली असून जन्मदात्या बापानेच आपल्या कोवळ्या जीवाला संपवल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत रागाच्या भरात स्वतःच्या अडीच वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकून देत जीव घेतला आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात (Dindori Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी या गावात ही संताप आणणारी घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन रागाच्या भरात अडीच वर्षाच्या बालकाला थेट विहिरीत फेकून देत त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे. दिंडोरी तालुक्यातील म्हाळुंगी येथील ही घटना असून पत्नीच्या फिर्यादीवरून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पोलिसांनी तात्काळ संशयित पतीला अटक केली आहे.


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी या गावात हे कुटुंब वास्तव्यास आहे. वर्षा राजेंद्र आपसुंदे आणि राजेंद्र छबू आपसुंदे हे दोघे या ठिकाणी राहतात. राजेंद्र हा पत्नी वर्षा यांच्या चारित्र्यावर संशय घेत नेहमी वाद घालत असायचा. या दोघांना अडीच वर्षाचा एक मुलगा असून यावरून देखील पती राजेंद्र नेहमीच पत्नी वर्षा हिस टोमणे मारत असायचा. हा मुलगा माझा नाही, असे बोलत तिचा मानसिक छळ करत होता. त्यातुनच त्यांनी रागाच्या भरात मुलगा घनश्याम यास गावातीलच निवृत्ती देवराम निकम यांच्या विहिरीत टाकून जीवे मारले असल्याची तक्रार वर्षा यांनी दिली.


त्यावरून दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी संशयित राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोनिका जेजोट या पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून बालकाच्या मृत्यूबाबत हळू व्यक्त केली जात आहे.


किरकोळ वादातून खून 


गेल्या काही दिवसांत नाशिक शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी फोफावली आहे. किरकोळ कारणावरून खुनाच्या घटना घडत आहेत. यामुळे पोलिसांचा वचक कमी झाल्याचे चित्र आहे. कौटुंबिक वाद, शेतीवरून वाद, भाईगिरीच्या वर्चस्व वादातून अनेकदा हाणामारी, प्राणघातक हल्ले, खून आदी घटना घडत आहेत. त्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. वेळीच पोलिसांनी या गुन्हेगारीचा बिमोड करणे आवश्यक आहे.