Akola Violence : अकोला दंगल प्रकरणात प्रमुख सहभाग असल्याचा आरोप असणाऱ्या अरबाज खानला अटक करण्यात आली आहे. इंस्टाग्रामवर अरबाज खानने वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याचा पोलिसांना संशय आहे. तसंच अरबाजने बेकायदा जमाव जमवल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे. 


ज्या पोस्टमुळे अकोल्यात दंगल उसळली होती ती सोशल मीडियावर व्हायरल करणे असा आरोप अरबाज खान याच्यावर आहे. तसेच रामदास पेठ पोलिस स्टेशनमध्ये जो बेकायदेशीर जमाव जमवला होता तो त्यानेच जमवला होता. या जमावाने नंतर शहरात अनेक ठिकाणी हिंसाचार केला. तसेच गंगानगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली असून त्यानेही फेक इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याचा आरोप आहे. 


अकोला दंगल प्रकरणाच्या मुळाशी जाण्याच्या अनुषंगाने अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अकोला दंगलीत प्रमुख सहभाग असल्याचा आरोप असलेल्या अरबाज खानला अकोला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अरबाज मुख्य तक्रारदार होता. तक्रार दिल्यानंतर तो फरार झाला होता. अरबाजनेच वादग्रस्त इंस्टाग्राम चॅटिंग एका विशिष्ट समाजाच्या गृपवर व्हायरल केल्याचा पोलिसांना संशय आहे. यासोबतच अरबाजनेच रामदास पेठ पोलिस स्टेशनमध्ये बेकायदा जमाव जमविल्याचा पोलिसांचा आरोप आहे. ज्या कथित इंस्टाग्राम अकाउंटवरून वादग्रस्त चॅटिंग झालं, त्या वादग्रस्त अकाउंट मालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दंगलीच्या तब्बल सहाव्या दिवशी अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 


कोण आहे अटक करण्यात आलेला अरबाज खान?


- या प्रकरणात इंस्टाग्रामवर धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणारा प्रकरणातील मुख्य तक्रारदार. 
- अरबाज हा सध्या मुंबईत व्हीएफएक्स अॅनिमेशन अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी. 
- अरबाज अकोल्यातील मोहता मिल भागातला रहिवाशी. 
- अरबाजवर रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देताना बेकायदा जमाव जमविल्याचा आरोप. 
- अरबाजनेच वादग्रस्त इंस्टाग्राम चॅटिंग व्हायरल केल्याचा आरोप.


वादग्रस्त पोस्टमुळे अकोल्यात दंगल


अकोला शहरातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठमध्ये काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली होती. या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. यात काही ठिकाणी दंगलखोरांनी आगीही लावल्याच्या घटना घडल्या. दंगलखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी जमावावर अश्रूधुराचा माराही केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले होते. एका व्यक्तीच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे ही दंगल भडकल्याचं बोललं जातं आहे. या व्यक्तीवर रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दंगलीत एकाचा मृत्यू झाला. तर दोन्ही गटातील 10 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.