Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात पुन्हा एक विवाहित महिला व्यवस्थेचा बळी ठरल्याची घटना पेठ (Peth) तालुक्यात घडली आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर परिस्थिती व्यवस्थित असताना देखील काही तासांत विवाहितेचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र व्यवस्थेने इथंही आपल्या मनमानी कारभाराचे प्रदर्शन मांडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 


नाशिक जिल्ह्यातील पेठ शहरानजीकच्या कापूरझिरापाडा या गावातील 26 वर्षीय ज्योती परशराम दळवी ही महिला प्रसुतीसाठी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात (Peth Rural Hospital) दाखल झाली होती. काल साडे अकरा वाजेच्या सुमारास तिने एका गोंडस बाळास जन्मही दिला. यानंतर तिच्याबरोबर आलेल्या आजीबाईशी संवाद साधला. म्हणजेच प्रसुस्तीनंतर ती प्रकृती स्थिर होती. मात्र दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक तिला जोराचा झटका आल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र प्रकृती स्थिर असताना अचानक झटका कसा आला? डॉक्टरांनी तपासण्या केल्यानंतर सर्व स्थिर होते मग अचानक असे काय झाले कि विवाहितेवर मृत्यू ओढवला? असे प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केले. विवाहितेच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 


दरम्यान विवाहितेच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकाराने सर्वच अचंबित झाल्याने चर्चा झाल्याने ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी वाढू लागली. तर आरोग्य प्रशासनाने आमच्याकडे मृतदेह ठेवण्यासाठी सुविधा नसल्याने घेऊन जाण्याबाबत सांगण्यात आले. मात्र त्यामुळे रोष निर्माण होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नातेवाईकांनी गोंधळ न करता मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेण्यात आला. या ठिकाणी अंत्यंसंस्काराची तयारी सुरु असताना अचानकपणे जिल्हा रुग्णालयाची शववाहिका आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांची विचारपूस न करता स्मशानभूमीतून विवाहितेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घेऊन गेले. 


अशा परिस्थितीत संभ्रमीत नातेवाईकांना हा प्रकार काय? याचा उलगडा होत नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत या विवाहितेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून मृत्यूनंतर न्याय मिळणे महत्वाचे आहे. दरम्यान या घटनेची पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असुन पुढील तपास पीएसआय उशिर यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. दरम्यान, कापूरझिरापाडा हे गाव प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभाळे यांचे कार्यक्षेत्रात येत असल्याने झालेल्या प्रकाराच्या चौकशीसाठी सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.


पेठ रुग्णालयाची अवस्था 
ग्रामीण भागात नागरिकांना प्रथमोचार मिळावेत यासाठी राज्यभरात ग्रामीण रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ रुग्णालय देखील परिसरातील नागरिकांना सेवा देत आहे. मात्र या रुग्णालयात अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधिक्षक पद हे रिक्त असून पाच वर्षांपासून स्रीरोग तज्ञपद रिक्त आहे. तर दंत चिकित्सक पद निर्मितीपासून 10 वर्षे रिक्तच असल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ रुग्णालय निमित्तमात्र आहे, अशा अनेक ग्रामीण रुग्णालयांची अवस्था बिकट आहे. मुळातच नाशिक जिल्हा रुग्णालयापासून ही सुरवात आहे. त्यामुळे तळागाळापर्यंतची आरोग्य व्यवस्था पूरती खिळखिळी झाल्याचे चित्र आहे. 


सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ..
एकीकडे सुस्त प्रशासन आणि ढिसाळ कारभारामुळे वारंवार सर्व सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नाशिकसारख्या जिल्हा रुग्णालयात मात्र आजही सर्वसामान्य नागरिक भीतीने जायचं टाळतात. मात्र परिस्थिती पुढे सर्व हतबल असल्याने दुसरा पर्याय नसतो. त्यानंतर जो काही त्रास सर्व सामान्य नागरिकांना अनुभवयास मिळतो. तो कल्पना करू शकत नाही. पेठ शहरात घडलेली ही घटना नवीन नाही. नाशिकच्या सिव्हिल परिसरात जर थांबला तर अनकेदा तुमची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही, त्यासाठी तुम्ही संवेदनशील असणं आवश्यक आहे.