PM Modi Man Ki Baat : 'जय जवान, जय किसान'चा (Jay Jawan Jay Kisan) नारा देत नंतर जय विज्ञान आणि जय अनुसंधान' या उक्तीला साजेशे काम करणारे मालेगाव येथील शिवाजी डोळे (Shiwaji Dole). शिवाजी डोळे आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आज शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच माजी सैनिकांना बरोबर घेऊन नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील जवळपास अठरा हजार लोकांना जोडण्याचे काम डोळे यांच्यासह त्यांच्या टीमने केल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (28 मे) रोजी सकाळी नव्या संसद भवनाचं (New Parliament Building) उद्घाटन केलं. या उदघाटनाच्या आधी पीएम मोदी यांनी 101 व्या मन कि बात मधून देशभरातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा करत असताना मालेगाव येथील शेतकरी शिवाजी डोळे यांचे कार्यक्रमामध्ये कौतुक केले आहे. शिवाजी शामराव डोळे येऊ मालेगाव (Malegaon) तालुक्यातील एक शेतकरी असून त्यांनी सैनिकी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आपल्या भागात पाचशे एकर जमिनीवर नंदनवन फुलविले आहे. त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच माजी सैनिकांना बरोबर घेऊन नाविन्यपूर्ण प्रयोग केले असून त्यांची महती आता देशभरात गेली आहे.
दरम्यान आजच्या मन कि बात कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांनी शिवाजी डोळे आणि त्यांच्या टीमच्या कार्य कर्तृत्वाबद्दल भरभरून कौतुक केले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, माझ्या प्रिय देशवासियांनो, 1965 च्या युद्धाच्या वेळेस, आमचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' हा नारा दिला होता. नंतर अटलजींनी त्याला जय विज्ञानही जोडलं होतं. काही वर्षांपूर्वी देशाच्या वैज्ञानिकांशी चर्चा करताना मी जनसंशोधनचा उल्लेख केला होता. मन की बात मध्ये आज एका अशा व्यक्तीबद्दल, एक अशा संस्थेबद्दल बोलणार आहोत जी 'जय जवान जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान या चारहींचे प्रतिबिंब आहे. हे गृहस्थ आहेत, महाराष्ट्रातील शिवाजी शामराव डोळे. शिवाजी डोळे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एका लहान गावचे रहिवासी आहेत. ते गरीब आदिवासी शेतकरी परिवारातील असून माजी सैनिकही आहेत. सैन्यात असताना त्यांनी आपलं जीवन देशाच्या सेवेसाठी वाहून टाकलं.
निवृत्तीनंतर शेतीकडे वळाले ....
तर देशसेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी काही नवीन शिकण्याचं ठरवलं आणि कृषी क्षेत्रात नवे करण्याच्या उद्देशाने कृषी पदविका घेतली. म्हणजे ते जय जवानपासून जय किसानकडे मार्गाक्रमण करत चालले होते. आता सातत्यानं त्यांचा हाच प्रयत्न असतो की, कृषी क्षेत्राला जास्तीत जास्त योगदान कसे देता येईल. आपल्या या मोहिमेत सुरवातीला शिवाजी डोळे यांनी 20 लोकांची एक टीम तयार केली. यात काही माजी सैनिकांना देखील सामावून घेण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या या पथकानं वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नावाची एक सहकारी संस्थेचं व्यवस्थापन हाती घेत तिच्या पुनरूज्जीवनाचा निर्णय घेतला.
पाचशे एकरवर शेतीचा नवा प्रयोग
सद्यस्थितीत शिवाजी डोळे आणि त्यांच्या टीमने यश राज्यासह इतर राज्यातही पसरल्याचे चित्र आहे. वेकंटेश्वरा को ऑपरेटिव्हचा विस्तार अनेक जिल्ह्यात झाला आहे. आज हे पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकात काम करत आहे. तिच्याशी जवळपास 18 हजार लोक जोडले गेले आहेत आणि त्यात मोठ्या संख्येंनं आमचे पूर्व सैनिकही आहेत. नाशिकच्या मालेगावमध्ये पथकाचे सदस्य 500 एकर जमिनीत शेती करत आहेत. हे पथक जलसंरक्षणासाठी अनेक तलाव तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. खास गोष्ट तर ही आहे की, यांनी सेंद्रिय शेती आणि डेअरीही सुरू केली आहे.