Nashik Gopal More : आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात, ज्यांचा संघर्ष इतरांना ऊर्जा देणारा असतो. मात्र काहीच माणसे स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार करतात आणि आपलं आयुष्य पणाला लावतात. परिस्थितीशी संघर्ष, समाजाशी संघर्ष, व्यवस्थेशी संघर्ष करत यशाला गवसणी घालत असतात. मात्र अशा कहाण्या आपण केवळ चित्रपटातून पाहत असतो. खऱ्या आयुष्यात निवडक माणसं समाजासाठी आयुष्य खर्ची करत असतात. त्यातलेच एक म्हणजे बागलाणचे शेतकरी गोपाळ मोरे, कोणत्याही चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असा हा संघर्ष. हा संघर्ष स्वतःसाठी नाहीतर बागलाणसह परिसरातील तमाम जनतेसाठी केलेला हा संघर्ष. जवळपास 35 वर्षांहून अधिकचा काळ आंदोलन करून तालुक्यासाठी धरण मंजूर करणाऱ्या चौथी पास शेतकऱ्याची ही गोष्ट. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून इथल्या दलित शोषित पीडितांना हक्काच पाणी मिळवून दिलं. तो काळ स्वातंत्र्यपूर्व काळ होता. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेकदा दुष्काळाचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागला. नाशिक जिल्ह्यातला बागलाण तालुक्याचा परिसर हा वर्षानुवर्षे पाण्यासाठी तहानलेला भाग. बागलाण तालुक्यातीलच चौंधाणे येथील गोपाळ मोरे नावाच्या चौथी पास शेतकऱ्याने हा भाग पाण्यात भिजवण्याची इच्छा मनात धरली आणि तिचा जिद्दीने पाठपुरावाही केला. या इच्छेपोटी आमदारापासून पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांचा पिच्छा पुरवला. गोपाळ मोरे यांची संघर्षगाथा, अभिमन्यू सूर्यवंशी यांनी कोण्या एकाची धरणगाथा या पुस्तकात शब्दबद्ध केलीय. आपल्यापैकी अनेकांना झारखंडचा दशरथ मांझी माहिती असतो, मात्र आपल्या जवळचे असे ध्येयवेडे माहिती नसतात. अभिमन्यू सूर्यवंशी यांनी मोठ्या कष्टांने गोपाळ मोरे यांचा संघर्ष शब्दबद्ध केलाय.. त्याचाही वेगळाच संघर्ष आहे. समकालीन प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलंय. आणि शेवटी आपल्या दुर्दम्य आकांक्षा आणि परिश्रमांनी धरण मिळवलंच. त्याची ही गोष्ट.


ही कथा आहे एका सामान्य गोपाळ मोरे या शेतकऱ्याच्या लढ्याची. त्यांचा जन्म 1 डिसेंबर 1912 साली झाला. त्यांच्या वडिलांचे तानाजी तर आईचे नाव सावित्री होते. गावात शाळेची सोय चौथीपर्यंत होती, त्यानुसार गोपाळ चौथीपर्यंत गावच्या शाळेत शिकले, मात्र त्यानंतर पुढे काही शिकू शकले नाही. त्यावेळी गोपाळच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या, त्या म्हणजे 1928 सालचा सारावाढ विरोधी सत्याग्रह आणि दुसरी 1930 सालचा जंगल सत्याग्रह. तेव्हापासून गोपाळ हा अनेक सभांना हजेरी लावत असे. अशाच स्वातंत्र्य चळवळीत फिरत असताना अनेकदा सधन परिसर पाहायला मिळत असत, मोठं मोठी धरणे, त्या बाजूला असलेला हिरवागार परिसर, यामुळे गोपाळच्या मनातही आपला परिसरही असाच हिरवागार व्हावा, अशी इच्छा मनात उत्पन्न झाली. त्यासाठी चणकापूर, भंडारदरा यासारखे एखादं धरण आपल्या गावाला व्हायला हवे, हा विचार गोपाळ मनात तरळून गेला. 


अशातच गोपाळ यांचं सया यांच्याशी लग्न झालं. आयुष्याचा संसार सुरू झाला होता, मात्र गोपाळच लक्ष समाजावर होत, त्यामुळे घर आणि शेतीकडे दुर्लक्ष होत गेलं, शिवाय पत्नी सावित्रीला मुलगा नसल्याने आई नाराज आहे, असा समज घेतला. यातून सावित्रीने गोपाळ यांनी दुसरं लग्न करावं, अशी गळ घातली, मात्र दुसऱ्या लग्नाला गोपाळचा विरोध होता, हा ना करता गोपाळ लग्नाला तयार झाला, मात्र विधवेशी लग्न करणार अस निक्षून सांगितलं. त्यानुसार मुंजवाड येथील रखमाशी दुसरा विवाह करण्यात आला. काही दिवसानंतर वडील तानाजी यांचे निधन झाले. त्यामुळे गोपाळ शेतीतही लक्ष घालू लागले, तसेच इतर वेळ स्वातंत्र्य चळवळीत देऊ लागले. एक वर्षी नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. गोपाळने तरुणांना एकत्र घेत अनेक कुटुंब स्थलांतरित केली, गुराढोरांना सुरक्षित स्थळी हलवलं. हे वर्ष चौंधाने गावसाठी फारच भयावह होत. या दुष्काळाने बागलाण तालुक्यातल्या लोकांचं जणू कंबरडं मोडलं होतं. रणरणत्या उन्हात मैलोन् मैल डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या बाया, करपून गेलेली पिकं, उपाशी असलेली जनावरं अशी सगळी परिस्थिती होती. 


गोपाळने गावातल्या मित्रांना सोबत घेत साल्हेर-मुल्हेरच्या पट्ट्यात जनावरांना चारण्यासाठी नेलं. काही महिन्याचा शिधा घेऊन ही मंडळी साल्हेरला पोहचली.  याच परिसरात फेरफटका मारत असताना गोपाळला आरम नदी दिसली. त्याचबरोबर इथली हिरवीगार शेती त्याच्या नजरेत भरली. ते पाहताना गोपाळच्या मनात चमकून गेलं, हे पाणी इथे अडवलं तर? तर इथे चणकापूर, भंडारदऱ्यासारखं मोठं धरण होईल, आपला दुष्काळ कायमचा संपेल. सारा बागलाण तालुका सुजलाम् सुफलाम् होईल आणि आपल्यावरील दुष्काळाचं अरिष्ट कायमचं टळेल.' असे मनात घोळवत मित्रांकडे धावत सुटला. त्याने ही गोष्ट मित्रांना बोलून दाखवली. पण त्याच कुणीही मनावर घेईना, काही महिन्यानंतर ते पुन्हा गावी आले. पण गोपाळच्या मनातून धरणाचा विषय काही जात नव्हता. अशातच गोपाळ मोरे यांच्या आईचे निधन झाले. यावेळी शेवटच्या घटका मोजत असताना त्यांची आई म्हणाली, 'तात्या, केळझर धरण व्हवाले पाहिजे ... आता मागे फिरू नकोस... मना आशीर्वाद तुना संगे शे...एवढं बोलून त्या माउलीने प्राण सोडला. 


तो काळ 1952-53 होता, त्यावेळी स्थानिक आमदार बिडकर दादा यांच्याशी बोलून त्यांनी संपूर्ण बागलाण तालुका पिंजून काढण्याचे ठरविले. गावागावात जाऊन गावकऱ्यांना धरणाची आवश्यकता समजावून सांगत सह्या, अंगठे घेत असत. अनेक आंदोलने, पत्र, निवेदने वेगवगेळ्या अधिकाऱ्यांना, नेते आमदारांना देत होते. त्यानंतर अनेक आमदार, खासदार, मंत्री यांना भेटून आले, पण कुणाचाच धरणाच्या कामाबाबत सकारात्मकता नव्हती. असे एकामागून एक अनेक वर्ष गेले. त्यासाठी अनेक आंदोलने, भेटी-गाठी त्यांनी सतत घेतल्या. अशातच एके दिवशी इंदिरा गांधी बागलाण तालुक्यातील अंबासन गावी पाण्याच्या टाकीच्या उदघाटनासाठी येणार असल्याचे कळाले. त्यांना धरणाचे निवेदन देण्याचे ठरले. मात्र जेव्हा कार्यक्रमात गेले, तेव्हा गर्दीने मैदान फुलून गेले होते. पोलिसांचा बंदोबस्त तैनात असल्याने कुणालाच स्टेजजवळ जाण्याची परवानगी नव्हती. मात्र गोपाळ मोरे थेट जात असताना पोलिसांनी अडवून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे धरणाची मागणी इंदिराजींपर्यंत पोहोचलीच नाही... 


नंतर 1957  निवडणुका लागल्या. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर मधुकरराव चौधरी पाटबंधारे मंत्री झाले. गोपाळ मोरेंनी त्यांना भेटायचं ठरवलं. त्यांच्या भेटींनंतर त्यांनी डांगसौंदाणे येथे बंधाऱ्याचे काम सुरु करण्यास सांगतो, असे गोपाळला सांगण्यात आले. गोपाळने यावर मंत्री महोदयांना बंधाऱ्यामुळे फक्त काही गावांना फायदा होणार असल्याचे समजावून सांगितले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर काही दिवसांनी कळवण तालुक्यातील चणकापूर येथे महाराष्ट्राचे राज्यपाल श्री प्रकाश येणार होते. यावेळी ही गोपाळ मोरे यांनी त्यांची भेट घेत धरणाची मागणी लावून धरली, मात्र आश्वासनाशिवाय त्यांच्या हातात काहीच मिळाल नाही. नंतर ही बराच काळ लोटला. यावेळी गोपाळ मोरे यांनी थेट दिल्ली दरबारी जाऊन आपली मागणी मांडण्याचा निर्णय घेत दिल्लीला गेले. मात्र पंतप्रधानांच्या व्यस्त कामकाजामुळे ही भेट होऊ शकली नाही. आणि फक्त पाटबंधारे खात्याच्या मंत्र्यांना निवेदन देऊन गोपाळ दिल्लीहून माघारी परतला. 


याचवेळी 1962 च्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. यात काँग्रेसकडून प्रमुख मागणी म्हणून केळझर धरणाचे काम करण्यात याव, असं सुचवण्यात आलं. मात्र त्यांची ही मागणी देखील मागणीच राहिली. या निवडणुकांनंतरही बराच काळ लोटला, यावेळी पुन्हा गोपाळ मोरे यांनी दिल्लीवारी केली. यावेळी ते थेट यशवंतराव चव्हाण यांना जाऊन भेटले. त्यांना केळझर धरणाचा विषय सांगून त्यांच्या पुढे आराखडा मांडला. मात्र यशवंतराव चव्हाण यांच्या मते जळगावच्या नेत्यांनी आरम आणि मोसम नदीवर धरण झालं तर गिरणा धरणात पाणी कुठून येणार, अशी शंका घेतल्याचे ते म्हणाले. त्यामुळे हा विषय प्रलंबित राहिल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी देखील गोपाळ मोरे यांना आश्वासन दिलं.


या दरम्यान महाराष्ट्राचे राजकारण काही स्थिर नव्हतं. यशवंतराव चव्हाण यांच्या जागी विदर्भातील कन्नमवार मुख्यमंत्री झाले, पण ते देखील अल्पायुषी ठरले. मात्र काही महिन्यात वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले तर काकासाहेब गाडगीळ राज्यपाल झाले होते. याचवेळी गोपाळ मोरेंनी पुण्याचे खासदार गुलाबराव जेधे यांची दिल्ली दरबारी भेट घेतली, त्यांना देखील केळझर धरणाबाबत योजना समजावून सांगितली. जेधेंनी त्याला पाटबंधारे खात्याच्या मंत्र्यांकडे नेलं. मंत्र्यांना त्यांनी निवेदनाबरोबरच आराखडा सादर केला. मात्र यावेळी देखील अर्जदाराची विनंती मान्य करता येणे शक्य नाही, असं सांगण्यात आलं, ही जवळपास गोपाळ मोरेंची तिसरी दिल्लीवारी होती. या दरम्यान गोपाळ मोरेंच्या मुंबई वाऱ्या, नेत्यांच्या गाठीभेटी घेणं हे सगळं सुरूच होत, अनेक वर्षांपासून सातत्याने हे सुरूच होत.


गोपाळ मोरे यांनी पुन्हा एकदा मुंबईवरून थेट दिल्ली गाठली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट घेण्याचं त्यांनी ठरवलं होतं. खासदार गुलाबराव जेथे यांच्यामार्फत त्यांनी या भेटीसाठी खूप प्रयत्न केला. पण यावेळी ही पंडितजींची भेट त्यांच्या नशीब नव्हती. याच दिवशी त्यांनी मोरारजी देसाई यांची भेट घेत त्यांना केळझर धरणाची योजना समजावून सांगितली. देसाई म्हणाले, 'अशा कुठल्याही योजनेचा प्रस्ताव आधी राज्याकडून यावा लागतो. नंतर तो संबंधित खात्याकडे जातो, आमचं काम निधी देण्याच, एकदा योजना मंजूर झाली की, आम्ही निधी जरूर उपलब्ध करून देऊ, पण आधी प्रस्ताव तर येऊ द्या', असे सांगितल्यानंतर दोघेही माघारी परतले.


पाच वेळा दिल्ली वारी.. 


याच दरम्यान पंडित नेहरू आणि कालांतराने लालबहादूर शास्त्री यांचे निधन झाले. या सगळ्या घडामोडी घडत असताना गोपाळ दिल्लीतच खासदार धैर्यशील पवार यांच्याकडे मुक्कामी होता. या सुमारास इंदिरा गांधी पंतप्रधान झालेल्या होत्या. नंतर नंतर गोपाळ घरी तालुक्यात, जिल्ह्यातच थांबू लागला, जे कोणी नेते मंडळी, मंत्री नाशिक जिल्ह्यात येतील तेव्हा त्यांची भेट घेत असत. त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करत असत. काही वेळा तर केळझर धरण झालेच पाहिजे, अशा घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधून घेत असत. सारे उपाय करून झाले सारे दारे वाजवून झाली. आता उपोषण हाच उपाय, असं गोपाळने ठामपणे ठरवलं होतं. आजवरच्या कामाची माहिती, सरकार दरबारी केलेला पाठपुरावा, उदाहरणे, धरणाची गरज सगळं काही सांगणार एक निवेदन आणि दहा दिवसात या धरणाला मान्यता मिळाली नाही. तर उपोषणाला बसण्याची नोटीस त्याने मुंबई -दिल्लीला पाठवून दिली. त्यानुसार ते बागलाण तहसील कचेरी आणि पोलीस स्टेशन आवारात केळझर धरण झालेच पाहिजे, असा बोर्ड घेऊन उपोषणासाठी बसले.


तहसीलदार येऊन गेले, त्यांनी आश्वासन दिले, मात्र गोपाळ मोरे उपोषणावर ठाम होते. शेवटी पाटबंधारे मंत्री शंकरराव चव्हाण भर पावसात चौंधाने गावी दाखल झाले. त्यांनी केळझर धरणांची जागा पाहिली. गोपाळला भरघोस आश्वासन देऊन ते देखील मुंबईला परतले. यानंतर सहा महिने गेले, वर्ष उलटलं तरी जागेचे सर्वेक्षण सुद्धा झालं नाही, गोपाळ काही खचलेला नव्हता, त्यांनी पुन्हा एकदा थेट दिल्ली गाठली. मात्र दिल्ली दरबारी राजकारण तापलं होतं. अनेक घडामोडी घडत असल्याने इंदिरा गांधी यांना भेटण्यासाठी संधी मिळाली नाही, गोपाळ मोरे तसेच माघारी परतले. घरी येऊन गोपाळने पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याची नोटीस नवी दिल्ली, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना पाठवली.


याच वेळी पोलीस अधीक्षक अय्यर यांनी गोपाळ मोरे यांची भेट घेत उपोषण गरजेच आहे का? असा विचारलं. यावेळी गोपाळ मोरे म्हणाले, 'साहेब माझी लढाई अंतिम टप्प्यात आली आहे, एक तर केळझर धरण होईल, नाहीतर हा गोपाळ पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करून आपले प्राण देईल', या दोन्हीपैकी एक गोष्ट नक्की होणार' तर अय्यर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार गोपाळ मोरे यांनी मालेगावचे खासदार झामरू मंगरूळ यांची भेट घेत पंतप्रधानांची वेळ मागितली. त्यानुसार काही दिवसातच पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मिळाली होती. गोपाळला विश्वास बसत नव्हता. गावात बैठक घेत काही गावकऱ्यांना सोबत घेऊन दिल्ली जाण्याचा निर्णय झाला. घराघरातून चारशे रुपये जमा झाले. या शिष्टमंडळाने रेल्वेने दिल्ली गाठले. दिल्ली गाठून खासदार कहांडोळ यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि काही वेळातच इंदिराजींच्या केबिनमध्ये गोपाळ मोरे आणि त्यांच्या शिष्ट मंडळांची भेट झाली.


अखेर इंदिरा गांधी यांच्या भेटीचा प्रसंग  


गोपाळ मोरे समोर बसले होते. इंदिराजी म्हणाल्या, 'मोरे जी काय समस्या आहे, तुमची, गोपाळ मोरे यांनी सुरुवात केली. 'मागील वीस वर्षांपासून प्रत्येक अधिकारी, नेते मंत्र्यांना केळझर धरणाबाबत निवेदन, अर्ज करत आहे. महाराष्ट्र आणि भारत सरकारला जवळपास 5000 हून अधिक अर्ज केले. मात्र कोठेच न्याय मिळाला नाही. त्यामुळे आज आम्ही तुमच्याकडे ही मागणी घेऊन आलो आहोत'. यावर इंदिराजी पुन्हा गोपाळ मोरे यांना म्हणाल्या, 'तुमचा पक्ष कोणता? यावर गोपाळ मोरे म्हणाले, 'मॅडम माझी कोणताच पक्ष नाही, फक्त केळझर धरण व्हावं, हाच माझा पक्ष असल्याचे मोरे म्हणाले.. इंदिरा गांधी यांनी गोपाळने दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी सूचना लिहिली. 'मुख्यमंत्र्यांनी न चुकता सदर जागेचा सर्वे करून धरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा त्यावर स्वाक्षरी करून ते निवेदन सचिवांकडे दिलं आणि त्या सचिवांना म्हणाल्या, 'महाराष्ट्र सीएम से बात करवाओ, हम खुद उनसे बात करेंगे. यानंतर इंदिरा गांधी यांनी फोन हातात घेत आपल्या धीर गंभीर आवाजात त्या म्हणाल्या, 'नाईकजी नाशिक डिस्ट्रिक्टके गोपाळ मोरे नाम के किसान मुझे मिलने आये है, वह बीस साल से एकही मांग कर रहे है की केळझर डॅम बने, जल्द से जल्द इस प्रस्ताव पर काम हो', एवढं बोलून इंदिराजींनी फोन खाली ठेवला.  गोपाळ मोरे आणि त्यांच्या साथीदारांकडे बघून त्या म्हणाल्या, 'आप लोक चिंता ना करे, जल्दी डॅम बन जायेगा, या एका वाक्याने गोपाळ मोरे यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर वाहू लागला. एवढ्या वर्षांच्या मेहनतीचे चीज होणार, असा आशावाद मनात तरळून गेला.


अचानक तब्येत बिघडली.. 


काही दिवसांतच पाटबंधारे खात्याचे अधिकारी जागेची पाहणी करण्यासाठी आले. यानंतर सर्वेक्षण होऊन वर्षभराचा कालावधी लोटला. गोपाळला पुन्हा चिंता वाटू लागल्याने त्यांनी मुंबई गाठली, त्या ठिकाणी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची भेट घेत धरणाला मान्यता का मिळाली नाही, आणि मिळाल्यांनतर स्थानिकांच्या पुनर्वसनाचे काय? अशा दोन मागण्या केल्या. यावर नाईक म्हणाले की, 'केळझर धरणाच्या मंजुरीची प्रक्रिया सुरु आहे. चिंता करू नका...' अखेर काही महिन्यानंतर केळझर धरणास प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे पत्र मिळाले. लवकरच तांत्रिक मान्यता मिळून धरणाच्या कामाला सुरवात होईल, असंही पत्राद्वारे सांगण्यात आले होते, पत्र वाचून गोपाळच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. अखेर वर्षभरात तांत्रिक मान्यताही मिळाली. त्याने पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना पत्र पाठवून मनापासून आभार मानले. अखेर महसूल आयुक्तांच्या मंजुरीनंतर शासनाच्या राजपात्र त्याला प्रसिद्धी देण्यात आली.


सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यावर धरणाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला. धरणाच्या कामाचा ठेका हैदराबादच्या पालमुर इंजिनियर्स कंपनीला देण्यात आला. जवळपास 700 हून अधिक मजूर कामावर होते. केळझर धरणाची उंची होती 32.50 मीटर आणि लांबी 13 36 मीटर हे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर होता. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यासाठी 86 मीटर लांबीच्या सांडव्याचा बांधकामही सुरू होत. धरणामुळे एकूण 33 94 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं. काही दिवसानंतर मोठ्या थाटामाटात चौंधाने गावात भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील पार पडला. धरणाचं काम सुरू असताना अचानक एके दिवशी गोपाळची तब्येत बिघडली. त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. तात्काळ दवाखान्यात उपचारासाठीसाठी दाखल करण्यात आले. पंधरा दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली काढल्यावर त्यांना घरी पाठवण्यात आलं. 


अखेर ती बातमी आली, धरण पूर्ण झाल्याची....


या परिस्थितीत दोन वर्षाचा काळ उलटला होता. अखेर ती बातमी आली, धरण पूर्ण झाल्याची. काही दिवसानंतर मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा पार पडला. याच दरम्यान इंदिरा गांधींचे निधन झालं. धरणाचे काम तर पूर्ण झालं होतच, मात्र दुसरीकडे गोपाळची तब्येत बरीच बिघडली होती. शेवटच्या  घटका मोजत होता. शेवटी शेवटी त्याने मुलगा पांडुरंगला सांगितलं, 'मी जेव्हा या जगातून जाईल, तेव्हा माझी राख या धरणात आणि आपल्या शेतात टाक,' अखेर 25 नोव्हेंबर 1984 रोजी गोपाळ मोरे यांचे निधन झालं. केळझर धरण 1981 पूर्ण झालं होतं, मात्र केळझर धरणास गोपाळ मोरे यांचे नाव द्याव, अशी मागणी बागलाण तालुक्यातील जनतेच्या वतीने 13 नोव्हेंबर 1997 रोजी करण्यात आली. जनतेच्या मागणीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने 2 जुलै 1999 रोजी त्यास मान्यता दिली व 2000 रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली. आज केळझर धरण गोपाळ सागर म्हणून ओळखल जात. मात्र यासाठी पूर्ण आयुष्य घालवलं, त्या केळझर धरणाचे पाणी चौंधाणे गावात कधीच पोहोचलं नाही, आजही गोपाळ मोरे यांचे शेत कोरडेच आहे. मात्र लोकप्रतिनिधी असमर्थता दाखवतात, तेव्हा या लोकशाही असलेल्या देशात सामान्य माणूस काय करू शकतो, हे तेव्हा प्रत्ययास आलं.


(साभार : अभिमन्यू सूर्यवंशी, कोण्या एकाची धरणगाथा) 


संबंधित बातमी : 


Nashik Baglan : बागलाणचं केळझर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, दिंडोरीच्या पुणेगाव धरणातून विसर्ग, नाशिक जिल्ह्याचा धरणसाठा!