Nashik Raundal Film : नाशिकमधून (Nashik) मराठी चित्रपट सृष्टीला नवी क्रश मिळाली असून राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या भाऊसाहेब शिंदे (Bhau Shinde) यांच्या रौंदळ चित्रपटातून (Raundal) नेहा सोनवणे हिने पदार्पण केले आहे. आजपासून (3 मार्च) रौंदळ चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याची मुलगी मराठी चित्रपटात झळकणार आहे.
नाशिक शहरातूनच नव्हे तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून अनेक नवे चेहरे रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. आता कळवण तालुक्यातील जुनीबेज गावातल्या सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील नेहा शशिकांत सोनवणे (Neha Sonawane) हिने चार चांद लावले आहेत. गजानन फडोळ (Gajanan fadol) दिग्दर्शित रौंदळ या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारुन आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. आजपासून रौंदळ चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच हा चित्रपट धुमाकूळ घालणार, आणि प्रेक्षक डोक्यावर घेणार हे निश्चित आहे.
दरम्यान रौंदळ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी नेहा सोनावणे ही मूळची कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील राहणारी आहे. तिने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' (Khwada) आणि 'बबन' या रोमँटिक चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला भाऊसाहेब शिंदे आणि मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी नेहा सोनवणे 'रौंदळ' चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. नेहा ही जुनी बेज येथील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेली असून तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण कळवण शहरात झाले आहे. तिने कॉम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण केली असून ती मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे. नेहाला चित्रपटसृष्टीचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता. महाविद्यालयात शिक्षण घेता घेता कुठलाही अनुभव नसताना जिद्द, चिकाटी आणि अस्सल शेतकरी असल्याने शेतीच्या कामातील ज्ञानाने-अनुभवाने तिला रौंदळ या चित्रपटातील भूमिका मिळाली.
मी शेतकऱ्याची मुलगी...
नेहाचा हा पहिलाच चित्रपट असल्याने प्रचंड मेहनत नेहाने आणि सर्वच टीमने घेतल्याचे दिसून येते. रौंदळ चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर, बारामती, नारायणगाव, पुणे या ठिकाणी करण्यात आले असून शुटिंग दरम्यान शेतीकामे, ऊसतोड, मोळी उचलण्याचा आदी अनुभव घेतल्याचे नेहाने सांगितले. तसेच शेतकऱ्यांसाठी असलेल्या चित्रपटात शेतकऱ्याची मुलगी म्हणून अभिनय करताना प्रचंड समाधान वाटल्याचे सांगितले. शेतीची माहिती, शेतीकामाची अंशत: सवयीमुळे मला चित्रपटात काम मिळाले. याशिवाय झाडावर चढणे सुद्धा ऑडिशनप्रसंगी काम मिळण्यासाठी महत्वाचे ठरले. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींनी शिक्षणासोबत शेतीतील अनुभव घ्यावा. शेतकरी कुटुंबातील मुली कुठल्याही क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवू शकतात, यावर विश्वास ठेवावा, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री नेहा सोनवणे यांनी दिली.
आजपासून चित्रपट प्रदर्शित
ज्यावेळी नेहाला रौंदळ चित्रपटात काम करणार का? विचारण्यात आले. शिवाय तिचा सहकलाकार ख्वाडा चित्रपटातील भाऊसाहेब शिंदे हे असणार आहे. यावर तिने लगेचच होकार दिला होता. नेहा सोनवणे हिचा हा पहिलाच चित्रपट असून तिने अतिशय उत्तम अभिनय केल्याचे ट्रेलर आणि प्रदर्शित झालेल्या गाण्यांवरुन दिसून येत आहे. या चित्रपटातील तिची भूमिका अतिशय वेगळी आणि आव्हानात्मक आहे. दरम्यान रौंदळ हा चित्रपट आजपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.