Nashik Crime : नाशिकसह जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच असून एकाच दिवशी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नाशिक शहरातील आडगाव परिसरात आत्महत्यांच्या दोन्ही घटनांनी खळबळ उडाली आहे. 


नाशिक (Nashik) शहरातील आडगाव शिवारातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षाच्या विद्यार्थिनीने म्हाडाच्या स्वप्नपूर्ती सोसायटीतील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणात आडगाव पोलीस ठाण्यात (Adgoan Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली. कल्याणी राजाराम थापाळे तालुका असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. थापाळे ही आडगाव शिवारात असलेल्या स्वप्नपूर्ती हाडा इमारतीत राहत होती. ती आडगाव परिसरात असलेल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. गुरुवारी (2 मार्च) सकाळी दहा वाजेपूर्वी थापाळे हिने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.


पोलिसांना दिली माहिती


दरवाजा सकाळी आतून बंद असल्याने तिला आवाज दिला असता प्रतिसाद न आल्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी थापाळे हिचा मृतदेह लटकलेला अवस्थेत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.


तरुणाने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आयुष्य संपवलं


दुसरी घटना नाशिकच्या आडगाव शिवारातील वृंदावननगर इथे घातली. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने चौदा मजली इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमाराला घडली. साहिल बापूराव पवार असे आत्महत्या करणाऱ्या इंजिनिअरचे नाव आहे. मदर तेरेसा आश्रमाच्या मागील बाजूस, दावन नगर येथे राहणाऱ्या साहिल पवार याने गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राहत्या इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉ. सुनील बेंद्रे यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. दरम्यान, साहिल पवारने आत्महत्या का केली? याचे कारण समोर आले नसले तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले... 


गेल्या काही वर्षात मानसिक ताणतणाव अधिकच वाढला आहे. घर, कुटुंब, संसार, नोकरी, शिक्षण आदी घटकांमुळे धावपळीचे जगणं झालं आहे. दरम्यान अशा घटकांतून मानसिक ताणतणावांत अधिकच भर पडल्याचे जाणवते. कारण नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून अनेकदा प्रेम, व्यसनांच्या आहारी जाणं, आजाराला कंटाळून, कौटुंबिक वादातून सामाजिक स्वस्थ बिघडत चालले आहे. अशातूनच आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. यामध्ये अधिकाधिक तरुण मुलामुलींचा समावेश असल्याचे समोर आले आहे.