Ruby Hall Clinic Kidney Racket : पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेटची (kidney) चौकशी करण्यासाठी (Ruby Hall Clinic) उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती नेमून तीन महिन्यात याबाबत अहवाल सादर करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत  (Tanaji Sawant )यांनी विधानसभेत केली. याबाबत भाजप आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता. या रॅकेटमधील मुख्य आरोपी फरारी आहे. ही संघटित गुन्हेगारी असून, या रॅकेटचे लोण महाराष्ट्रात पसरल्याचे मिसाळ यांनी निदर्शनास आणले. 


धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारित रुग्णालयांमध्ये मोफत किंवा पन्नास टक्के सवलतीच्या दरात गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची अनियमितता तपासण्यासाठी लेखा परीक्षकांच्या मार्फत परीक्षण करुन अनियमितता आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केली.


यापूर्वी डॉक्टरांवर गुन्हा दाखल


यापूर्वी  पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे (Ruby Hall Clinic) प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह हॉस्पिटलमधील सहा डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. ज्या महिलेची किडनी काढण्यात आली ती महिलाही बनावट कागदपत्रं तयार करुन यात सहभागी असल्याचं आढळून आल्याने तिच्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. एकूण 15 जणांच्या विरोधात पुणे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला होता. सारिका सुतार या महिलेने तिची फसवणूक करुन तिची किडनी काढल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. या चौकशीत पोलिसांना सारिका सुतार या महिलेची 15 लाख रुपयांच्या बदल्यात किडनी काढून दुसऱ्या व्यक्तीला बसवण्याचे ठरले होते असे आढळले होते. त्यासाठी सारिका सुतार यांची बनावट नावाने कागदपत्रं तयार करण्यात आली. मात्र सारिका सुतार यांना ठरल्याप्रमाणे 15 लाख न देता चार लाखांवर त्यांची बोळवण करण्यात आली आणि म्हणून त्यांनी तक्रार दिल्याचे पोलिसांना चौकशीत आढळून आलं होतं. ही फसवेगिरी करण्यात रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर आणि व्यवस्थापनातील अधिकारी देखील सहभागी असल्याच पोलिसांना चौकशीत आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी सर्वांच्याच विरोधात गुन्हा नोंद केला होता. याच प्रकरणी आता चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. 


संबंधित बातमी-

पुण्यात किडनी तस्करी, 15 लाखांचं आमिष दाखवून काढली किडनी, नंतर पैसे देण्यास नकार