Jalna Crime News : जालना जिल्ह्यात (Jalna District) एक धक्कादायक घटना समोर आली असून आहे. दहा हजार रुपयांच्या खंडणीसाठी तृतीयपंथीयाचे लिंग परिवर्तन करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे इतर तृतीयपंथीयांनी मारहाण करत त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात पंधरा ते वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चंदनझिरा परिसरातील सुंदरनगर भागात राहणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटकही केली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तृतीयपंथीय जालना शहरातील कन्हैय्यानगर भागात वास्तव्यास आहे. दरम्यान सुंदरनगर परिसरात राहणारे संशयित आरोपी इम्रान ऊर्फ तनुजा, नीलेश ऊर्फ निशा, नयना सलमान पठाण, माही पाटील, आकाश कोल्हेसह इतर पंधरा ते वीस जणांनी पीडित तृतीयपंथीयाला मारहाण केली. त्यानंतर दर महिन्याला दहा हजार रुपये आपल्याला आणून देण्याची धमकी दिली. असे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तर मारहाणीत जखमी झालेला फिर्यादी जालना शासकीय रुग्णालयात उपचार घेत होता. दरम्यान 15 मार्चला संशयितांनी शासकीय रुग्णालयात गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस पुन्हा मारहाण केली होती. तसेच फिर्यादीचे लिंग परिवर्तन केले.


पुणे येथे नेऊन केलं लिंग परिवर्तन...


पीडित तृतीयपंथीयाला आधी आरोपींनी मारहाण करुन महिन्याला दहा हजार रुपयांची खंडणी देण्याची धमकी दिली. तर रुग्णालयात उपचार घेत असताना त्याला पुन्हा मारहाण करूनपुण्याला नेले. तसेच पुणे येथे नेऊन विविध शस्त्रक्रिया करुन फिर्यादीचे लिंग परिवर्तन करण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे एवंढ सर्व करुन देखील फिर्यादीला घरी जाऊ दिले नाही, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात पंधरा ते वीस जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मारहाण करुन 25 हजार रुपये लुटल्याचा प्रकार 


दुसऱ्या एका घटनेत मारहाण करुन 25 हजार लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. जुन्या बॅटऱ्या विकायच्या आहेत, असे फोनवर सांगून एकाला भोकरदन नाका परिसरातील एका हॉटेलच्या मागे बोलावून मारहाण करण्यात आली. त्यानंतर 25 हजार 300 रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मुर्तझा मल्लिक इद्रीस मल्लिक (वय 43 , रा. इस्लामनगर, मेरठ, ह.मु. जाफरखान चाळ, जुना जालना) यांनी सदर बाजार ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयित श्रीकांत जाधव, कृष्णा पवार (दोघे रा. जालना) यांनी मुर्तझा मल्लिक इद्रीस मल्लिक यांना फोन करुन जुन्या बॅटरींची विक्री करायची आहे, असे सांगून हॉटेलच्या मागे बोलावले. तिथे गेल्यानंतर संशयितांकडून मल्लिक यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर खिशातील 25 हजार 300 रुपये काढून घेतले. या प्रकरणी मल्लिक यांच्या फिर्यादीवरुन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


धक्कादायक! दारूमध्ये विषारी औषध पाजून एकास ठार मारण्याचा प्रयत्न; जालना जिल्ह्यातील घटना