Nashik News : मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) वाडीवऱ्हेजवळ रात्री साडेआठ वाजता बिबट्याला (Leopard) भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेत बिबट्याची साडेतीन वर्षाची मादी गंभीर जखमी झाली. वनविभागाच्या (Nashik Forest) रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत जखमी बिबट्याला सुरक्षित केंद्रात नेत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र तासाभरातच उपचारादरम्यान मादीचा मृत्यू (Leoaprd Death) झाल्याचे वन विभागाने सांगितले.


दरम्यान मुंबई आग्रा महामार्ग नागरीक तसेच वन्यजीवांसाठी धोकादायक बनत चालला आहे. दिवसेंदिवस वाढते अपघात वन्यजीव अधिवासाला त्रासदायक ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या मादी येथूनच रस्ता ओलांडून नैसर्गिक अधिवासात जात असताना भरधाव वाहनाने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बिबट्या रस्त्यावरून थेट दुभाजकावरील झाडे फेकला गेल्याचे काही प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. बिबट्या जखमी झाल्याची काही लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जवळ जाऊन बघितले असता त्याची हालचाल दिसून आली नाही. तातडीने याबाबत वाडीवऱ्हे पोलिसांना वनविभागाला कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नाशिक इगतपुरी वनपरिक्षेत्राचे अधिकारी कर्मचारी यांचे रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचले. तातडीने अवघे दहा ते पंधरा मिनिटात बिबट्याला पिंजऱ्यात सुरक्षित टाकून नाशिकला औषध उपचारासाठी हलवण्यात आले.रात्री साडेनऊ वाजेपर्यंत बिबट्यावर गंगापूरच्या रोपवाटिकेत उपचार सुरू होते


नाशिक शहराजवळील मौजे शेवगे दारणा येथील एका शेतात दोन दिवसांपूर्वी एक वर्षाचा बिबट्या मृताअवस्थेत आढळून आला होता. शेतकऱ्याने घटनेची माहिती दिल्यानंतर नाशिक पश्चिम विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला होता. येथील शेतकरी चंद्रभान नामदेव कासार यांच्या मालकी गट क्रमांक मालकी शेतीत बिबट्या मृता अवस्थेत पडल्याचे आढळले होते. तसेच या बिबट्याच्या मानेवर काही जखमा दिसून आल्या होत्या. बिबट्याच्या वयापेक्षा मोठ्या प्राण्यांनी हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला होता. 


तर दुसरीकडे दारणा काठावरीलच जाखोरी शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. जाखोरी शिवारातील एका मळ्यामध्ये विहिरीमध्ये दोन वर्ष वयाचा बिबट्या कोसळला होता. शेतकरी प्रसाद निवृत्ती बोराडे यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याने तात्काळ वनविभागाशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली होती.  वनपरीक्षेत्राच्या रेस्क्यू पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढले. जाखुरी येथील शेतकरी प्रसाद निवृत्ती बोराडे यांच्या मालकीच्या शेतात उघड्या विहिरीमध्ये दोन वर्षे वयाचा बिबट्या कोसळला. 


रोड किलचे प्रमाण वाढतेच ! 
दरम्यान गेल्या काही दिवसांत रस्ते अपघातात बिबटे जखमी झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. मागील पंधरा दिवसांत एका बिबट्याच्या रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घटना झाल्यानंतर वनविभाग तात्पुरत्या स्वरूपात पाऊले उचलून नंतर या घटनांकडे फारशे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे वन्यप्राणी अधिवासात जत असताना किंवा पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे भटकत असताना अनेकदा रस्त्यात वाहनाच्या धडकेत बिबट्याना आपले प्राण गमवावे लागत आहेत, अनेक बिबट जखमी होत आहेत. या नित्याच्या घटना असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे महत्वाचे आहे.