Ambadas Danve On Maharashtra Police: औरंगाबादच्या पैठण येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत बोलतांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी वादग्रस्त विधान केले असून, 'पोलीस चाटायचे कामे करतायत' असे विधान दानवे यांनी केले आहे. पैठण येथे सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत महाप्रबोधन यात्रा (Maha Prabodhan Yatra) आयोजित करण्यात आली होती. यावेळी विरोधकांवर टीका करतांना दानवे यांनी पोलिसांवर देखील टीका केली. 


यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, आमच्या सभेला येणाऱ्या गाड्यांच्या नंबरची नोंद केली जात आहे. येथील काही पोलीस देखील चापलूसी करतायत, चाटायचं काम करतायत. पण लक्षात ठेवा हे जास्त दिवस नसून, उद्या आम्हीपण येणार आहोत या जागेवर. आम्ही सभा घेत असलेल्या ठिकाणी आत्तापर्यंत किती सभा झाल्या आहेत, याचा रेकोर्ड काढून पहा,तपासून पहा किती सभा झाल्या आहेत. पण तुम्हाला आता प्रश्न दिसत आहे. त्यामुळे पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतायत, पगार मंत्री भुमरे यांचा घेत आहेत का? सरकारचा घेत आहेत. पोलिसांना सांगतोय मस्ती करू नका, मस्ती आमच्या अंगात देखील आहे. तर मस्ती कराल तर तुम्हाला सुद्धा धडा शिकवू, मी सर्वांच्या बाबत बोलत नाही, पण मोजक्या काही लोकांबद्दल बोलत असल्याचे देखील दानवे म्हणाले. मात्र दानवेंच्या या विधानामुळे पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


भुमरे यांच्या कारखान्यात मनी लॉन्ड्रिंग


यावेळी पुढे बोलतांना अंबादास दानवे यांनी रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्यावर देखील टीका केली. भुमरे यांच्या पैठण तालुक्यातील शरद कारखान्यात मनी लॉन्ड्रिंग चा प्रकार घडला आहे. याचे सर्व पुरावे देखील माझ्याकडे आहेत. त्यामुळे या सर्व पुराव्यासह मी हा मुद्दा विधानसभेत मांडणार असल्याचे देखील अंबादास दानवे म्हणाले. 


ब्रह्मगव्हाणचं काम भुमरेंच्या जावायला... 


तर भुमरे यांच्यावर टीका करतानाच दानवे यांनी काही गंभीर आरोप देखील केले आहे. भुमरे म्हणतात की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना मला निधी देत नव्हते. पण ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेसाठी भुमरे यांना निधी उद्धव ठाकरे यांच्या काळातच मिळाला. तर याच ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेचं काम भुमरे यांच्या जावयाला कसे मिळाले. विशेष म्हणजे एखाद्या घरखरेदीप्रमाणे भुमरे यांच्या जावयाने मूळ कंत्राटदारकडून ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेच्या कामाची रजिस्ट्री करून घेतली असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला आहे. तर पैठण तालुक्यात विकास कामे करण्यापेक्षा भुमरे यांनी दारूची दुकाने अधिक उघडली असल्याचं देखील दानवे म्हणाले. 


Exclusive Video : खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अक्षरशः पैशांचा पाऊस, कव्वालीच्या कार्यक्रमात उधळले पैसे