Pune railway:  पुण्याहून मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज आणि उद्या प्रवासाचा बेत असेल तर वाहतूक व्यवस्थेत केलेले बदल लक्षात घेऊनच प्रवासाला निघा. कारण मध्य रेल्वेवर आजपासून 27 तासांचा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे आज (19 नोव्हेंबर) ते सोमवार(21 नोव्हेंबर) पुण्याहून(Pune) मुंबईकडे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये 15 गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवाय प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी 24 तास हेल्प डेस्कही सुरू करण्यात आला आहे. प्रवाशांना गरज भासल्यास पुणे स्थानकातून जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्याचंही नियोजन करण्यात आलं आहे. 


 मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक दोन दिवसांपासून पूर्णपणे विस्कळीत आहे. अनेक प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाच्या योजना बदलल्या आहेत. गदग-मुंबई ही रेल्वे अल्पकालीन रेल्वेमुळे मुंबईऐवजी पुण्याला धावणार आहे. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे रेल्वे प्रशासनाने स्थानकावर अतिरिक्त तिकीट तपासनीस आणि व्यावसायिक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


आरक्षण केंद्रावर सध्याच्या तिकीट खिडकीसह अतिरिक्त तिकीट खिडकी उघडली जाईल. प्रवाशांना दादर, कल्याणला इतर गाड्यांमधून जायचे असल्यास त्यांना इतर गाड्यांमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे स्थानकांवर योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांनी मागणी केल्यास त्यांना एसटीने मुंबईला पाठवण्याचे नियोजनही रेल्वेने केले आहे, पुणे  रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी सांगितलं आहे. 


कोणत्या गाड्या असणार बंद?
यात शनिवारी (दि. 19) धावणाऱ्या पुणे - मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (12128), कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस (17412) आणि रविवारी धावणाऱ्या मुंबई - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (12127), मुंबई- पुणे डेक्कन एक्स्प्रेस (11007), मुंबई - पुणे सिंहगड एक्स्प्रेस (11009), मुंबई - पुणे प्रगती एक्स्प्रेस (12125), मुंबई - पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (12123), मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस (17411), पुणे- मुंबई सिंहगड एक्स्प्रेस (11010), पुणे - मुंबई डेक्कन क्वीन (12124), पुणे- मुंबई प्रगती एक्स्प्रेस (12126), पुणे - मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (11008), पुणे - मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (12128) आणि सोमवारी धावणारी मुंबई - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (12127) रद्द झाली.