Nashik SSC Result : नाशिकमध्ये (Nashik) आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून सिडको भागातील इंदिरानगर (Indiaranagar) परिसरात 16 वर्षीय मुलीच्या खुनाची घटना घडली आहे. मुलीच्या आई-वडिलांच्या तक्रारीनुसार सदर मुलीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र इंदिरानगर पोलिसांच्या अधिक तपासानंतर मुख्य कारण समोर येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 


नाशिक शहरात गुन्हेगारीच्या (Crime) घटना रोजच घडत आहेत. मारहाण, खून, प्राणघातक हल्ले यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. अशातच शहरातील इंदिरानगर भागातील कैलासनगर परिसरात खुनाचा प्रकार घडला आहे. सोळा वर्षीय मुलीला इमारतीवरून ढकलून देत तिचा खून केल्याची घटना 1 जून रोजीची आहे. या प्रकरणी संशयित घोटी (Ghoti) शहरात वास्तव्य असलेल्या विनायक सुरेश जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित जाधव हा मुलीचा मित्र असून या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. यावरूनच हा खून झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. 


पोलिसांनी दिलेली माहिती, आणि वडील हनुमान काळे यांच्या तक्रारीनुसार 16 वर्षी मुलगी ती इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असताना अचानक खाली कोसळली. या घटनेत तिला जबर दुखापत झाल्याने तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. मुलगी इमारतीवर असताना कुणीतरी धक्का दिल्याने ती खाली पडली, असा आरोपही तिच्या आई-वडिलांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी संबंधित घटनास्थळावर सीसीटीव्ही व इतर तपास केला, मात्र यामध्ये कोणतीही व्यक्ती आढळून येत नसल्याने आत्महत्या की हत्या याबाबत अजून पोलीस तपास सुरू आहे. मात्र मुलीच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नेमक प्रकरण काय? 


दरम्यान ही 16 वर्षीय मुलगी संशयित विनायक जाधव यांच्यात प्रेमप्रकरण असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून संपर्क होता. सुरवातीला या दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली. हळूहळू दोघांमध्ये चॅटिंग वाढली. यानंतर दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. जवळपास सहा महिने संपर्कात राहिल्यानंतर काही कारणास्तव वाद झाल्याने दोघांमध्ये बिनसले. त्यानंतर गुरुवारी ही मुलगी इमारतीवरून कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर सदर मुलीच्या मोबाईल तपासणी केली असता पोलिसांना संबंधित विनायक यास ब्लॉक केल्याचे दिसून आले. त्यावरून त्याचा तपास करून त्यास घोटी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरीही पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 


दहावीला 57 टक्के 


मयत मुलगी हीने दहावीची परीक्षा दिली होती. निकालाच्या एक दिवस अगोदर तिच्यासोबत दुदैवी घटना घडली. दहावीच्या निकालात तिला 57 गुण मिळाले. दहावीच्या निकालाच्या पूर्वसंध्येला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. त्यातच दुसऱ्या दिवशी दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला. यात तिला 57 टक्के गुण मिळाले आहेत. मात्र निकाल बघण्यापूर्वीच तिने जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.