Ahmadnagar News : गेल्या काही दिवसांपासून मंदिरात ड्रेसकोड (dresscode) ठेवण्याबाबत मोठा वाद सुरु आहे. नागपूर (Nagpur), पुणे शहरातील काही मंदिरांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तर सप्तशृंगी देवी मंदिरात देखील ड्रेस कोड लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र हा निर्णय अद्याप झालेला नाही. अशातच आता अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील 16 मंदिरांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात दर्शनासाठी येताना नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. 


राज्यातील विविध मंदिरांमध्ये ड्रेसकोडबाबत (Mandir) सक्ती केली जात असताना या सक्तीबाबत राजकीय वातावरण देखील तापलं आहे. अनेक नेत्यांनी ड्रेसकोड संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली असल्याने अनेकांनी विरोध तर काहींनी समर्थन दर्शविले आहे. काही ठिकाणी ड्रेसकोडवरून मोठे राजकारणही पेटले असून विविध मंदिरांनी ड्रेसकोड सक्तीही केली आहे. तर काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिर (Tuljabhawani Mandir) प्रशासनाने ड्रेसकोड सक्ती करून पुन्हा ती मागेही घेतली. आता अहमदनगर शहरातील ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात आजपासून ड्रेसकोडबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 


अहमदनगर शहरात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या (Maharashtra Mandir Mahasangh) वतीने पत्रकार परिषद घेत ही माहिती देण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने शहरातील छोट्या-मोठ्या सोळा मंदिरात या ड्रेस कोडबाबत नियमावली बंधनकारक करण्यात आली आहे. या नियमावलीचे उद्यापासून सक्तीचे पालन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली आहे. त्यानुसार दर्शनासाठी आता नियमावली जारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी मंदिर परिसर आणि गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. 


या मंदिरात असेल सक्ती


अहमदनगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर, तुळजाभवानी माता मंदिर बुरानगर, श्री शनि मारुती मंदिर माळीवाडा, शनि मारुती मंदिर दिल्ली गेट, शनि मारुती मंदिर झेंडीगेट, तुळजाभवानी माता मंदिर सबजेल चौक, श्री गणेश राधा कृष्ण मंदिर मार्केट यार्ड, श्रीराम मंदिर पवन नगर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वणी नगर या मंदिरात उद्या पासून आणि अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरामध्ये दोन महिन्याच्या आत वस्त्र सहिंता लागू होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली. 


नागरिकांमध्ये संभ्रम 


अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील सोळा मंदिरात ड्रेसकोड बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली असून उद्यापासून हे नियमन लागू होणार आहेत. मात्र अद्याप मंदिर प्रशासनाकडून ठोस नियम देण्यात आलेले नाहीत. कोणत्या कपड्यांवर बंदी? दर्शनाचे नियम काय असणार? याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. मात्र उद्यापासून हा नियम होणार असल्याने मंदिर प्रशासनाकडून उद्याच यावर निश्चित नियमावली जाहीर केली आहे.