Kolhapur News : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Kolhapur Agricultural Produce Market Committee) निवडणुकीतून शिवसेना सत्ताधारी आणि विरोधी पॅनेलमधूनही बाहेर पडला आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसिद्धीपत्रकातून याबाबत घोषणा केली आहे. शिंदे गटातील गद्दार असलेल्या कोणत्याही आघाडीमध्ये सहभागी होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिंदे गटातील गद्दार लोक असलेल्या आघाडीमध्ये सहभागी होणार नाही, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पराभव झाला तरी चालेल, पण गद्दार शिंदे गट असलेल्या आघाडीसोबत कोणतीही निवडणूक लढवणार नाही. सत्ताधारी आघाडी विरोधात शिंदे गटासोबत समझोता होऊन तयार झालेले पॅनेल आम्हाला मान्य नसल्याचे संजय पवार म्हणाले. 


शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधातील आणि शिंदे गटाच्या मदतीने झालेले पॅनेल हे आम्हाला मान्य नाही. शिंदे गटाशी कुठलीही सोयरीक आयुष्यामध्ये भविष्यात कुठल्याही राजकारणात शक्य होणार नाही. महाविकास आघाडीच्या विरोधातील पॅनेलला शिंदे गटाच्या उपस्थितीला आमचा प्रचंड विरोध आहे. 


महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला वाईट दिवस दाखवणाऱ्या शिंदे गटाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती व आघाडी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून मला मान्य नाही. राजकारणामध्ये मतमतांतर असू शकतात. परंतु, सत्तेच्या कोणत्याही ठिकाणी यश दृष्टीक्षेपात असलं तरी सुद्धा शिंदे गटाबरोबर कोणत्याही प्रकारची युती कोल्हापुरात केली जाणार नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोल्हापूर बाजार समितीमध्ये भले अपयश पदरी आलं, तरी अडचण नाही. परंतु, शिंदे गटाशी कुठलीही युती कधीही होणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन संजय पवार यांनी केले. 


18 जागांसाठी 51 उमेदवार रिंगणात 


कोल्हापूर बाजार समितीच्या विकास संस्था गटातील 11, ग्रामपंचायत गटातील चार, अडते व्यापारी गटातील दोन व हमाल, मापाडी गटातील एक अशा 18 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. दरम्यान, कोल्हापूर बाजार समितीसाठी 585 उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्यानंतर समितीच्या 18 जागांसाठी 51 उमेदवार रिंगणात आहेत. महिला प्रतिनिधी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व भटक्या विमुक्त गटात दुरंगी लढती होणार आहेत. अन्य गटात बहुरंगी लढतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. रिंगणात असलेल्या उमेदवारांना आज (21 एप्रिल) चिन्हवाटप केले जाणार आहे. 28 एप्रिलला मतदान होणार आहे. बाजार समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य आणि शिंदे आणि ठाकरे गटाने मिळून राजर्षी शाहू आघाडी पॅनेलची घोषणा केली होती. मात्र, आता ठाकरे गट बाहेर पडला आहे. दरम्यान, डावललेल्या उमेदवारांनी बंडखोरी करत शिव-शाहू शेतकरी परिवर्तन आघाडी पॅनेलची घोषणा केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या