Nashik Onion Crop : नाशिक (Nashik) जिल्ह्यात धुक्याची चादर अजूनही कायम असल्याने याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. पिकांवर परिणाम होण्यास सुरुवात असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

  
एकीकडे राज्यात थंडीचा जोर (Cold Weather) कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा (Temperature) पारा घसरल्यानं हुडहुडी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आत असल्याने वातावरणातील गारठा कमी झालेला नाही. जिल्ह्यात धुक्याची चादर अजूनही कायम असल्याने याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होत आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात कांदा पिकावर (Onion Crop) करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 


नाशिकमध्ये कांदा पीकही रोगाच्या विळख्यात सापडले असून कांदा पिकावर करपा तसंच मावा कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. एकीकडे कांदा पिकाला थंडी पोषक असते. परंतु सततच्या ढगाळ आणि बदलत्या वातावरणामुळे माव्याचे कीटक कांदा पातीतील पोषणतत्त्वे शोषून घेतात. त्यामुळे कांद्याची वाढ होत नाही. तसेच गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आडगाव येथील शेतकरी सुदाम हळदे यांनी बोलताना सांगितली. दरम्यान ढगाळ वातावरण आणि पहाटे पडणारे धुके यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तरी शेतकऱ्यांनी बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची नियमितपणे फवारणी करणे आवश्यक आहे," असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे.


कांदा पिकावर परिणाम 


एकीकडे नाशिकसह जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी कांदा पिकाची भरमसाठ लागवड केली आहे. जिल्ह्यातील विविध भागातून मजूर मागवून कांदा लागवड झाली आहे. चांगला भाव मिळेल या हेतूने केलेली कांदा लागवड वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खराब हवामानाचा फटका या पिकाला बसल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. सध्या कांद्याचे बाजारभाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांनी केलेला प्रचंड खर्च वसूल होईल की नाही, याबाबत शंका आहे. कांदा पीक हे शेतकऱ्याचे यावर्षी आर्थिक गणित बिघडणार की फायद्याचे ठरणार, हे सगळे बाजारभावावर ठरणार आहे.


थंडीचा जोर कमी होणार 


गेल्या दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये पारा कमालीचा घसरला आहे. राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (India Meteorological Department) वर्तवला आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांत थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज आहे. राज्यभरात सरासरी 14 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळं राज्यात थंडीचा जोर वाढला आहे.