नवी दिल्ली: राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाला स्थगिती मिळावी अशा आशयाची सीबीआयची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. मनी लॉंड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने (CBI) आणि ईडीने (ED) कारवाई केली होती. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन दिला होता. त्यावर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 


मुंबईचे माजी पोलिस आयुक्त (Param Bir Singh) यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.


अनिल देशमुखांना ईडीकडून 1 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली. ईडीनं देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीनं अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने दोन्ही प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला होता. देशमुखांना जामीन मंजूर झाल्यानंतर सीबीआयने त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत त्याला स्थगिती मिळावी अशी विनंती केली होती. 


सुरुवातीला उच्च न्यायालयाने देशमुखांच्या जामीनाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयानेही तीच भूमिका घेतल्याने अनिल देशमुखांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


नेमकं प्रकरण काय?


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. परमबीर सिंहांनी लेटर बॉम्ब टाकला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. 1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीनं देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीनं अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते.