Nashik Accident : पुणे (Pune) शहरातील नवले ब्रिजवर (Nawale Bridge) झालेल्या भीषण अपघातानंतर नाशिकमध्ये (Nashik) देखील डंपरने दोन वाहनांना उडविल्याची घटना घडली आहे. आज दुपारी चार वाजेच्या सुमारास मुंबई नाक्यावरील शताब्दी हॉस्पिटलजवळ हा अपघात झाला.


पुणे येथील अपघाताची घटना ताजी असताना नाशिकमध्ये एका डंपरने दोन कारला धडक दिली आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुंबई नाका (Mumbai Naka) परिसरातील शताब्दी रुग्णालयाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन क्रेटा कार आणि दोन दुचाकीचा समावेश आहे. डंपर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुढे असलेल्या क्रेटा कारला हा डंपर जाऊन धडकला. यानंतर दुसऱ्या क्रेटा कारला धडक बसली. यात रस्त्याच्या बाजूला असलेल्या दोन दुचाकीला सुद्धा डंपरने धडक दिली. या घटनेबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


पुण्यानंतर नाशिक शहरात अपघातांची मालिका सुरूच असून मद्यपी प्राध्यापक आणि रिक्षाचालकांनंतर आता डंपरने मुंबई नाक्यावर दोन महागड्या वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले असून या धडकेत इतर दोन दुचाकीचे नुकसान झाले आहे. मुंबई नाका हा वर्दळीचा परिसर असून नेहमीप्रमाणे कालिका मंदिराकडून मुंबई नाक्याकडे डंपरसह इतर दोन वाहने जात होती. यावेळी रस्त्यात वर्दळ क्सझाल्याने डंपर चालकाने पुढील कारला धडक. यानंतर या कारने पुढच्या क्रेटा कारला धडक दिली. याचबरोबर डंपर धडकेनंतर बाजूला गेल्याने उभ्या असलेल्या दोन दुचाकींचा अपघात झाला. यात कारसह दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून अपघातानंतर डंपर चालकाने पळ काढला. 


दरम्यान या अपघातात जीवितहानी नसून मुंबई नाका परिसरात अपघात झाल्याने काही काळ आवाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शिवाय डंपर चालकाने पळ काढल्याने डंपर रस्त्याततच उभा होता. मात्र मुंबई नाका पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर अपघात झाल्याने तात्काळ मदत मिळाली. सध्या अपघातचा गुन्हा दखल करण्याचे काम सुरु असून नाशिक शहरात वाढती वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, अतिक्रमण यामुळे सातत्याने अपघातात वाढ होत आहे. 


पुण्यातील नवले पुलावर अपघात 
पुण्यातील नवले पुलावर (Navale Bridge) अपघात सत्र सुरूच आहे. काल रात्रीच्या सुमारास नवले पुलावर भीषण अपघात झाल्याचं समोर आले. या अपघातामध्ये 24 गाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाने दिली आहे. सहा जण या अपघातात जखमी झाले आहे. अग्निशमन दलाच्या 2 रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू होते.  एका ट्रकने तब्बल 24 हुन अधिक वाहनांना धडक दिल्याचे समोर आले. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील (Sinhagad Road Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत काही नागरिकांच्या मदतीनं अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.