Kolhapur Police : गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर शहर परिसरात मिशाही न फुटलेल्या भुरट्या गुडांची वाढत चाललेली मर्दुमकी, मोठ्या बापाच्या बिघडलेल्या दिवट्या पोरांचा खुलेआम 'दम मारो दम', दोन सराईत गुंडांची झालेली निर्घृण हत्या, हातकणंगले तालुक्यात दारुअड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी गेल्यानंतर गुडांनी पोलिसांवरच केलेला हल्ला पाहता कोल्हापूरमध्ये पोलिसांचा वचक संपत चालला की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भुरट्यांची कुंडली समोर असताना पोलिस बघ्याची भूमिका का घेत आहेत? असाही प्रश्न निर्माण होतो. इचलकरंजीमधील सराईत गुंड अजित नाईकची जामीनावर सुटका झाल्यानंतर काढलेली वरात त्याचेच द्योतक आहे का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. अजित नाईक हा खून आणि खंडणीच्या गुन्ह्यात जेलची हवा खात होता. मात्र, जामिनावर सुटताच त्याची मैदान मारून आल्यासारखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये गाड्या आणि त्यांचे गल्लीतून मिरवणारे चमचेही दिसून आले. अजित नाईक येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. व्हायरल व्हिडिओ महामार्गावरील आहे. 


सोशल मीडियातूनही व्हिडिओ आणि रिल्स करून एकमेकांना खुन्नस देणे आणि त्यातून वाद वाढत जाण्याचेही प्रकार घडत आहेत. राजकीय नेत्यांवर असभ्य भाषेत शेरेबाजी करणाऱ्यांना शोधून काढून कारवाई केली जात असतानाच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या भुरट्यांच्या नाड्या आवळण्यात पोलिसांना नेमकी कोणती अडचण होत आहे? असाही प्रश्न निर्माण होतो. 


दीड महिन्यांत दोन गुंडांचा खून आणि झोपडपट्टीतील वाढती दादागिरी


कोल्हापूर शहरात भुरट्या गुंडांचे टोळीयुद्ध भडकल्याचे गेल्या दोन महिन्यांच्या घडामोडीतून स्पष्ट दिसून येत आहे. शहरातील झोपडपट्टी परिसर हा एकप्रकारे अशांत टापू झाल्याची परिस्थिती आहे. 24 सप्टेंबर रोजी जामिनावर सुटलेल्या चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय 25) या सराईत गुंडाचा निर्घृण खून केल्याची घटना यादवनगरमध्ये घडली. चिन्यावर मारामारी, खुनीहल्ला, खंडणी वसुलीचे 10 ते 12 गुन्हे दाखल होते. त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती. 


या घटनेचा विसर पडत नाही तोपर्यंतच 13 नोव्हेंबर आणखी एका सराईत गुंडाचा मुडदा पाडण्यात आला. कोल्हापूर पोलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगार कुमार गायकवाड (वय 22, रा. मोरेवाडी, कोल्हापूर) यांचा तलवारीने वार करून खून झाला. ही घटना सुद्धा कोल्हापूर शहरात वाढत चाललेल्या टोळीयुद्धातूनच झाली. 


लक्षतीर्थ वसाहतमध्ये चाकू हल्ला 


याच महिन्यात एक आठवड्यापूर्वी लक्षतीर्थ वसाहतीमध्ये चाकूने हल्ला करण्याची घटना घडली. या वादात ऋषीकेश रवींद्र नलवडे हा जखमी झाला. ही घटना सुद्धा पूर्ववैमनस्यातून घडली. 


भर चौकात हुक्का ओढून दिवट्या पोरांचा माज


सराईत गुंडांच्या खूनांची मालिका सुरुच असतानाच आता बापाच्या पैशाने बिघडलेल्या दिवट्या पोरांचा उन्मादही चिंतेचा विषय आहे. एबीपी माझाने गांधीनगरातील दिवट्या पोराचा 'दम मारो दम' केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचचले होते. कधी हुक्का, तर कधी बेदरकार गाडी चालवणे, तर कधी मध्यरात्री फटाके फोडणे असा त्याचा रुबाब सुरु होता. त्याचा दम मारो दम हा कार्यक्रम कुणाच्या जोरावर सुरु आहे? अशीच चर्चा रंगली होती. एबीपी माझाने दणका दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी गांधीनगरमधील विशाल पहुजासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिस तोपर्यंत काय कारवाई करत होते, हा प्रश्न उपस्थित होतो. 


सोशल मीडियातून आव्हान 


सोशल मीडियातून व्हिडिओ, रिल्स करून एकमेकांना धमकी देण्याचे तसेच आपण गल्लीत श्रेष्ठ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न या सडक छाप गुंडांकडून आणि बिघडलेल्या दिवट्या पोरांकडून केला जात आहे. वचक निर्माण करण्यासाठी सुद्धा असे प्रकार घडत आहेत. सोशल मीडियात देण्यात येणारी धमकी आता रस्त्यावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे या टोळीयुद्धाचा भडका होण्याअगोदर नाड्या आवळण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या