Nashik News : नाशिक (Nashik) म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे (Shivsena) महापालिकेतील कार्यालय व अध्यक्षपदाचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला असून ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर, शिंदे गटाचे प्रवीण तिदमे या दोघांची पोलीस चौकशी करत असून त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीनंतर या कार्यालयाचा वाद मिटण्याची शक्यता आहे. आता चौकशीनंतर दोघांनाही 16 नोव्हेंबर ची तारीख देण्यात आली आहे. 


मागील तीन महिन्यांपासून ठाकरे शिंदे-गट वाद (Thackeray-Shinde Clashes) इरेला पेटला आहे. अशातच नाशिकमध्ये (Nashik) वेळोवेळी या दोन्ही गटात वादाची ठिणगी पडली आहे. अशातच नाशिक महापालिकेचे कामगार सेनेचे कार्यालय कुणाकडे राहणार यावरून वाद सुरू आहे. दरम्यान शिवसेनेत असलेले प्रवीण तिदमे हे अध्यक्षपदी होते, मात्र त्यांनी शिंदे गटाची वाट धरली. शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या हकालपट्टी ही करण्यात आली होती. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मुनिसिपल कर्मचारी सेनेचा अध्यक्ष असल्याचा दावा केला होता. शिवाय कार्यालय ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात अध्यक्षपदावरून वाद सुरु झाल्याने पोलिसांनी हे कार्यालय सील केले. 


दरम्यान ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर आणि शिंदे गटाचे प्रवीण तिदमे या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असून त्यांना दावेदारी करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आली आहेत. त्यावरून आता दोघेही पोलीस चौकशीसाठी गेले असून चौकशीमध्ये नक्की काय होतंय? कोणाच्या ताब्यात कार्यालय जातंय? आणि अध्यक्षपदी कोण विराजमान होतंय? याकडे सगळ्यांच्या लक्ष लागले आहे. शिंदे आणि ठाकरे गटातील नाशिकमधील वादाचा हा पहिला अंक होता. त्यामुळे चौकशीनंतर नेमका काय निकाल लागतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता चौकशीनंतर दोघांनाही १६ नोव्हेंबर ची तारीख देण्यात आली आहे. 


कामगारांना फटका 
शिंदे आणि ठाकरे गटाच्या (Shinde Thackeray Group) वादात नाशिक म्युनिसिपल कामगार कर्मचारी संघटनेचे कार्यालय सील करण्यात आले आहे. ज्या कामगारांना हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली. त्या संघटनेच्या अध्यक्ष पदावर दोन्ही संघटनांनी हक्क सांगितल्यानं हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले आहे. या वादामुळं कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठीचं व्यासपीठच बंद झालं आहे. त्यामुळं आता हा वाद कसा आणि कधी मिटणार याकडे लक्ष लागून आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्या लाभ होतो असे आपण ऐकत आलोय. मात्र इथे उलटे झाले आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या भांडणाचा कामगारांना फटका बसतो आहे. 


प्रकरण नेमकं काय? 
सध्याचे शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रविण तिदमे शिवसेनेचे नगरसेवक आणि संघटनेचे अध्यक्ष होते. मात्र त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं अध्यक्ष पदावरून त्याची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर बडगुजर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह संघटनेच्या अध्यक्ष पदाच्या कार्यालयात प्रवेश केला. मात्र बडगुजर यांची केलेली नियुक्ती बेकायदेशीर असून कार्यालयाचे कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश केला. त्यात आमचे महत्वाचे कागदपत्रे गहाळ झाल्याचा आरोप प्रविण तिदमे यांनी केला असून सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या दोघांचा वाद हा पोलिसांपर्यंत गेला असून याबाबतचा निकाल चौकशीनंतर समोर येईल.