Maharashtra Politics: अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यात सुरू असलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत आज सकाळी झालेल्या बैठकीनंतर रवी राणा यांनी बच्चू कडूंबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनीदेखील आक्षेपार्ह वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.
मागील काही दिवसांपासून रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. राणा यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतले असल्याचा आरोप केले होते. राणा यांच्या या वक्तव्याने दुखावलेल्या कडू यांनी निर्वाणीचा इशारा देताना राणा यांनी माफी मागावी अथवा सरकारविरोधात भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर, रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात समेटासाठी बैठक झाली. त्यानंतर आज सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा यांची बैठक झाली. त्यानंतर राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आमदार रवी राणा यांनी म्हटले की, शिंदे-फडणवीस हे माझे मार्गदर्शक नेते आहे. वर्षा बंगल्यावर अडीच तास मिटिंग झाली. आमदार बच्चू कडू यांच्या बरोबर वाद होते, काही मतभेद होते ते मिटले. त्यांनीदेखील काही अपशब्द वापरले आहेत. हे शब्द ते देखील मागे घेतील. आम्ही दोघेही सरकार सोबत आहोत. सरकारबरोबर आम्ही काम करू. माझ्याकडून वादावर पडदा पडला असल्याचेही राणा यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या 50 आमदारांमध्ये त्या वक्तव्याने गैरसमज पसरले असतील अथवा आमदार दुखावले असतील तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे राणा यांनी म्हटले.
राणांच्या दिलगिरीवर बच्चू कडू म्हणतात...
आमदार रवी राणा यांनी माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनीदेखील माध्यमांशी संवाद साधला. कडू यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे त्यांचे आभार मानतो. आज संध्याकाळी 6 वाजता कार्यकर्त्यांची बैठक आहे. अमरावतीला त्यानंतर मंगळवारी उद्या मी भूमिका जाहीर करणार आहे. मी काही अयोग्य केलं असं मला वाटत नाही. माझ्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न या आरोपांमुळे निर्माण झाला होता. त्यामुळे भूमिका घेणे महत्त्वाचे होते. उद्या बैठकीत कार्यकर्ते काय भूमिका घेतील यावर माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कडू यांनी सांगितले.