Nashik Bullock Cart : बैलगाडा शर्यतीवर (Bullock Cart Race) बंदी उठवल्यानंतर राज्यभरात बैलगाडा शर्यतींचे (Bullock Cart race) आयोजन करण्यात येत आहे. या दरम्यान बैलगाडा शर्यत एका नागरिकाच्या जीवावर बेतली आहे. नाशिकमध्ये बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या मखमलाबाद येथील नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. श्रावण जगन्नाथ सोनवणे असे या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकच्या (Nashik) म्हसरुळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली आहे.


महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीची (Bailgada Sharyat)  परंपरा असून असंख्य हजारो बैलगाडा प्रेमी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करताना दिसून येतात. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात यंदा मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याच सुमारास नाशिक शहरातील म्हसरुळ परिसरात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मोकळ्या मैदानावर असलेल्या या बैलगाडा शर्यतीचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी ही भरपूर होती. यावेळी मखमलाबाद येथील श्रावण सोनवणे हे देखील उपस्थित होते. मात्र एका शर्यतीदरम्यान गोंधळ उडाल्याने ते जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. 


नाशिक (Nashik) शहरातील म्हसरुळ ग्रामस्थ आणि मखमलाबाद लिंक रस्त्यावरील ठक्कर मैदानावर आयोजित बैलगाडा शर्यत अनेक कारणांमुळे गाजली होती. या प्रसंगी स्थानिक आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikle) उपस्थित होते. विजेत्यांसाठी मोटरसायकल, 51 हजार, 31 हजार, 21 हजार रुपयांसह दीड हजार रुपयांची अनेक बक्षिसे ठेवण्यात आली होती. शर्यतीत 200 हून अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे मैदानावर प्रचंड गर्दी झाल्याने नियोजन कोलमडले होते. रणरणत्या उन्हातही मैदान प्रेक्षक आणि बैलगाड्यांनी भरुन गेले होते. चार ते पाच बैलगाड्या एकाच वेळी धावू शकतील, अशी शर्यत मार्गाची व्यवस्था होती. पण हा मार्ग बंदिस्त नसल्याने धावत्या बैलगाड्यांमध्ये आलेले काही प्रेक्षक जखमी झाले. जवळपास आठहून अधिक प्रेक्षक जखमी झाले होते. 


मदतीचे आवाहन 


दरम्यान शर्यत पाहण्यासाठी गेलेले श्रावण सोनवणे हे देखील गोंधळात जखमी झाले होते. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बैलगाडा शर्यतीत ही दुर्दैवी घटना घडल्याने शर्यतीच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. सोनावणे यांच्या दुर्दैवी मृत्युमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बैलगाडा शर्यतीमुळे मृत्यू झालेल्या सोनवणे कुटुंबियांना मदत देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.


अनेक जण जखमी झाले होते


हीच बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेले मखमलाबाद म्हसरुळ लिंक रोड येथील श्रावण सोनवणे देखील जखमी झाले होते. त्यांना प्रथम खासगी रुग्णालय आणि नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सोनवणे यांच्या कुटुंबीयांनी दिली. दरम्यान शर्यतीवेळी जखमी झालेल्या पाच जणांवर मविप्रच्या आडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातील दोघांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहेत. उर्वरित तिघांची प्रकृती स्थिर आहे. अन्य तीन जखमींना मनपाच्या रुग्णालयात उपचार करुन सोडून देण्यात आले आहे.