Chhagan Bhujbal : वेदांता - फॉक्सकॉन (Vedanta) सारखा एक मोठा प्रकल्प गुजरातला पळवला गेला. विमान दुरुस्त करणारा ‘सॅफ्रन’ चा प्रकल्प देखील हैदराबादला गेला. आमचे दोन अडीच लाख कोटींचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला केवळ 02 हजार कोटीचा प्रोजेक्ट दिला. हे म्हणजे त्यांनी गुजरातला फॉक्सकॉन (Foxcon) दिला मात्र महाराष्ट्राला पॉपकॉर्न दिला अशी सडकून टीका छगन भुजबळ यांनी केली. 


राष्ट्रवादी (NCP) मंथन वेध भविष्याचा हे दोन दिवसीय कार्यकर्ता शिबीर शिर्डी येथे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना छगन भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, देशात वाढती महागाई, बेरोजगारी, गॅसचे दर, पेट्रोलचे दर, अर्थव्यवस्थेची लागलेली वाट, कोळसा संकट, वाढते खाद्यतेल दर या सगळ्या वरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी जाणुन बुजुन तुमच्या समोर वेगळे मुद्दे आणले जात आहे. जेंव्हा केंद्रात आघाडी सरकार होते तेंव्हा महगाईचा दर हा 4.7 टक्के होता. आज हा दर 14.55 टक्के एव्हढा वाढलाय की तुमच्या घरात तुम्हाला रोज लागणाऱ्या सगळ्या वस्तुंच्या किमती ह्या 200 ते 300 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आत्ताच दिवाळी पार पडली मात्र कितीतरी लोकांच्या घरात खायला अन्न देखील नव्हते. शेतकऱ्यांवर पावसामुळे मोठे संकट ओढावले मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची मदत हे सरकार देत नाही. महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आ वासून उभे असतांना नोटेवर कोणाचा फोटो याचीच चर्चा जास्त असल्याची टीका त्यांनी केली.   


वेदांता - फॉक्सकॉन सारखा एक मोठा प्रकल्प गुजरातला पळवला गेला. तेंव्हा यापेक्षा मोठा प्रकल्प आणु असे म्हणणाऱ्यांनी अजुन एकही प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. या उलट फॉक्सकॉन पाठोपाठ आता टाटा एअरबस चा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आधीचा 1 लाख 54 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आणि टाटा एअर बस चा  22 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला दिवाळी गिफ्ट म्हणून देण्यात आला महाराष्ट्रातले रोजगार, तुमच्या हक्काचे रोजगार गुजरातला पळविले जात आहेत. स्वतः त्यासाठी रतन टाटा यांना पत्र लिहिले होते, की तुम्हाला सर्व सुविधा देऊ महाराष्ट्रात आणि या नाशिकमध्ये प्रकल्प घेऊन या एचएलएल च्या सोबत या एअरबसचे उत्पादन करा, त्यासाठी तुम्हाला सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. मात्र तो प्रकल्प गुजरातला गेला. विमान दुरुस्त करणारा ‘सॅफ्रन’ चा प्रकल्प देखील हैदराबादला गेला. आमचे दोन अडीच लाख कोटींचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला केवळ 2 हजार कोटीचा प्रोजेक्ट दिला. हे म्हणजे त्यांनी गुजरातला फॉक्सकॉर्न दिला मात्र महाराष्ट्राला पॉपकॉर्न दिला अशी सडकून टीका त्यांनी केली. 


शेतकऱ्यांना एकरी 50 हजार मदत द्या
राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार केल्याने शेतकरी पूर्णत: कोसळून गेला आहे. विशेष करून पिके तोंडाला आलेली असतानाच ऑक्टोबरच्या पावसाने पार वाताहत केली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र सध्याच्या सरकारला याकडे पहायला वेळ नाही. शेतकऱ्यांसाठी वेळ नाही फक्त दही हंडी आणि गणपती साजरे करण्यात पुढे असणारे हे सरकार आहे. शेतकऱ्यांना एकरी 50 हजार मदत द्या ही मागणी भाजपाचे नेते करत होते आता सत्ता आली तर ते आश्वासन विसरले. राज्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे दौऱ्यावर जातात. आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात तुम्ही दारू पिता का..? यावर आम्ही मात्र शांत रहाणार नाही येणाऱ्या अधिवेशनात या सरकारला धारेवर धरल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.