Nashik News : राज्यात दोन उपमुख्यमंत्री (DCM) मग आमच्या गावालाही दोन उपसरपंच देता येईल का? गावाचा विकास करण्यास अधिक मदत होईल. अशा आगळ्या - वेगळ्या मागणी संदर्भात नाशिकच्या मालेगाव (Malegaon) तालुक्यातील चंदनपुरी येथील सरपंचाने तहसील कार्यालयाकडे पत्र देऊन मार्गदर्शन मागवले आहे. तसेच आमच्या ग्रामपंचायतीसह राज्यातील इतर ग्रामपंचायतींना देखील दोन उपसरपंच नियुक्त करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. 


नाशिकच्या (Nashik) मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी (Chandanpuri) हे गाव राज्यात खंडेरायाचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. खंडेरायाची दुसरी पत्नी बानाईचे हे गाव असून गावची लोकसंख्या ही 6623 इतकी आहे. चंदनपुरी ग्रामपालिकेत 9 सदस्यांचे संख्याबळ असून 22 कर्मचारी या गावात कार्यरत आहेत. ग्रामपालिकेचे वार्षिक उत्पन्न 35 लाखांच्या आसपास आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असल्याने गावाला दोन उपसरपंच मिळाल्यास गावाचा जास्तीचा विकास साधता येईल, अशी अपेक्षा बाळगून गावाला दोन उपसरपंच मिळावेत म्हणून तहसील कार्यालयाकडे सरपंच विनोद शेलार यांनी मार्गदर्शन मागवले आहे.


दरम्यान दोन उपसरपंच (Upsarpanch) मिळाल्यास सामजातील विविध घटकांना पदाच्या माध्यमातून आणि गावाच्या विकासातून योगदान देता येईल. दरम्यान, राज्याला दोन उपमुख्यमंत्री तसेच राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना दोन उपसरपंच द्यावेत अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे सरपंच परिषदेच्या माध्यमातून करणार असल्याचेही सरपंच विनोद शेलार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. चंदनपुरी गावातील सरपंचाने दोन उपसरपंच नेमण्याबाबत मार्गदर्शन मागितले आहे. मात्र ग्रामपंचायत अधिनियमाची तपासणी केली असून याबाबत दोन उपसरपंच नेमण्याबाबत कायद्यात कुठलीही तरतूद नसल्याचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी स्पष्ट केले.


पत्राची सोशल मीडियावर चर्चा 


राज्यात ज्याप्रमाणे दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक गावात दोन उपसरपंच पदाची पद्धत लागू करण्याची मागणी चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगरचे सरपंच राजीव सुदामराव साळुंके यांनी देखील अशीच मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर आता मालेगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या चंदनपुरी गावातील सरपंचाने अशी मागणी केली आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री मग दोन उपसरपंच देखील नेमण्यात यावे ही मागणी मान्य होवो अथवा ना होवो मात्र चंदनपुरी सरपंचांनी काढलेले निवेदन सोशल मिडीयात प्रचंड व्हायरल झाल्याने या पत्राची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.


असा आहे उपमुख्यमंत्रीपदाचा इतिहास


देशातील अनेक राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याचे उदाहरण आहे. मात्र याचा एक इतिहास देखील आहे. मुळात देशाच्या संविधानात उपमुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही स्पष्ट असा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र सत्तधारी पक्षातील किंवा आघाडीतील वाद मिटवण्यासाठी, नेत्याला संतुष्ट करण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद एक ऐवजी दोन दिले जातात. बिहारमधील अनुग्रह नारायण सिन्हा यांची भारतातील पहिले उपमुख्यमंत्री म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. 


इतर संबंधित बातम्या : 


राज्यात दोन उपमुख्यमंत्री, मग दोन उपसरपंच पद्धतही लागू करा; माजी सरपंचांची मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी